Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्लीतल्या
नवीन संसद भवन इमारतीचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार
आहे. संसदेची ही नवी इमारत चार मजली असून, तिला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात
लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास ४०० खासदार बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात
आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील, तसंच या बाकांमध्ये हजेरी,
मतदान तसंच भाषांतर ऐकण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असतील.
दरम्यान,
पंतप्रधान मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा एकशे एकावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नीती आयोगाची
आठवी बैठक नवी दिल्लीत सध्या सुरू आहे. या बैठकीत विकसित भारत @ 2047: Role of
Team India या संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत अन्य सात
प्रमुख विषयांवरही चर्चा होणार आहे, यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, पायाभूत
सुविधा आणि गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पोषण, कौशल्य विकास तसंच सामाजिक
पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत सहभागी आहेत.
****
आंतरराष्ट्रीय
बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कच्च्या तेलाची किंमत
प्रती पिंप ७७ डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल आणि वायू
विपणन कंपन्यांनी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइलच्या
संकेतस्थळानुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९६ पूर्णांक ७२ रुपये तर डिझेलचा
८९ पूर्णांक ६२ रुपये, आणि मुंबईत पेट्रोलचा भाव १०६ पूर्णांक ३१ रुपये तर डिझेलचा
९४ पूर्णांक २७ रुपये इतका आहे.
****
राष्ट्रीय
आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजनेअंतर्गत राज्यासाठी दोन हजार २७० कोटी
रुपयांच्या पुरवणी निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली.
****
अडचणीत सापडलेली
कमी किमतीची विमानसेवा कंपनी गो फर्स्टनं ३० मे पर्यंत आपली सर्व उड्डाणं रद्द केली
आहेत. कंपनीनं आज ट्विट करून ही माहिती दिली. यापूर्वी दोन मे रोजी गो फर्स्टनं अचानक
विमानांचं उड्डाण रद्द करण्याची घोषणा केली होती. देय पद्धतीनुसार ग्राहकांना लवकरच
पैसे परत केले जातील असं कंपनीनं ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
विद्यार्थ्यांचं
दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचं स्वरूप बदलण्याची सूचना शालेय शिक्षणमंत्री
दीपक केसरकर यांनी केली आहे. पुणे इथं काल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व विभागांच्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तकं एकात्मिक स्वरुपात चार भागांमध्ये विभागून,
प्रत्येक पाठ किंवा कवितेनंतर गरजेनुसार कोरी पानं समाविष्ट करावीत, असं त्यांनी सांगितलं.
शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या दप्तराचं ओझं कमी होईल, असं
केसरकर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या लेखनाचं शिक्षकांकडून अवलोकन होणं आवश्यक
आहे, आधार नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही,
याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
****
पशुसंवर्धन
विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या प्रक्रियेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
झाली असून, ११ जून ही शेवटची तारीख आहे. जुलै महिन्यात उमेदवारांची लेखी परिक्षा होईल,
असं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
पंढरपूरच्या
श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल
नाक्याची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी, भारतीय जनता
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन
गडकरी यांच्याकडे केली आहे. यावर्षी आषाढी
यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी आणि त्यांची
वाहनं जाणार आहेत. पंढरपूर जवळील राष्ट्रीय महामार्ग ९६५ वरील पेनूर इथं पथकर वसुली
नाका उभारण्यात आला असून, त्यावर जून महिन्यापासून टोल वसुली प्रस्तावित आहे.
****
औरंगाबाद
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्धाटन
आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज झालं. शेतकरी ते थेट ग्राहक योजनेअंतर्गत मराठवाड्यातले
केशर आंबा उत्पादक शेतकरी, कोकणातील देवगड, सिंधुदुर्ग, चिपळूण इथले आंबा उत्पादक शेतकरी
या महोत्सवात सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment