Friday, 26 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.

·      शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन.

·      धुळे शहरातील श्री पार्श्वभैरवधाम मंदिरातून अडीच किलो वजनाच्या चांदीच्या मुकूटाची चोरी.

·      औरंगाबादमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय आंबा महोत्सव.

आणि

·      मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये बाद फेरीतील अखेरचा सामना थोड्याच वेळात, विजेत्याची अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी होणार लढत

****

नव्या संसद भवनाचं उद्घघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकीलानं ही याचिका मागे घेतली. दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्घाटन परवा २८ तारखेला होणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ रुपयांचं नाणं देखील जारी करणार आहेत. दरम्यान, संसद आणि राष्ट्रपतींना कोणत्याही वादापासून दूर ठेवण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय पक्षांना आणि नेत्यांना केलं आहे.

****

नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आलं. शिर्डी ते भरवीर या ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी मार्ग सुरू होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री या दोघांनीही व्यक्त केला. समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

****

राज्यातील जनतेला याआधी आपल्या कामांसाठी सरकारकडे जावं लागत होतं. मात्र, आमच्या सरकारच्या काळात शासनच तुमच्या दारी येत आहे. हे जनतेचं सरकार आहे. त्यामुळे जनतेला, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, त्यांची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या कार्यक्रमानिमित्त ते कन्नडमधील सभेत आज ते बोलत होते.

****

धुळे शहरातील श्री पार्श्वभैरवधाम मंदिरातून दोन ते अडीच किलो वजनाचा चांदीचा मुकूट आणि २५ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांसह दानपेटीतील सुमारे २० ते २५ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मंदिराच्या रखवालदाराच्या खोलीला बाहेरून कडी लावून चोरांनी रात्री साडेतीन ते साडेचार वाजेदरम्यान ही धाडसी चोरी केली. घटनेची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला.

****

औरंगाबादमध्ये उद्यापासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सभापती राधाकिशन पठाडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –

(सभापती राधाकिशन पठाडे)

हा आंबा महोत्सव २७ पाच ते ३१ पाच पर्यंत असं त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.

****

खरीप हंगामात खतं, बियाणं आणि किटकनाशकं खरेदी किंवा विक्री करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नांदेड इथं जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत ९९७०६३०३७९ किंवा ९६७३०३३०८५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असं नांदेडच्या जिल्हा कृषी अधिक्षकांनी कळवलं आहे. कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर सोळा अशा एकूण १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी आज तिच्या निर्धारित वेळेपेक्षा आठ तास उशिरा धावत आहे. या रेल्वेची नियमीत वेळ सकाळी अकरा वाजताची असून ती आता संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल.

****

ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचं मध्यरात्री साडेबारा वाजता ठाण्यात जव्हार इथे निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वैद्य आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य हे रवींद्र वैद्य यांचे बंधू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश परीक्षेचा डेटा हॅक करणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं पुणे इथून नुकतीच अटक केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली संयुक्तपूर्व परीक्षेची सुमारे ९४ हजार १९५ प्रवेशपत्रं बेकायदेशीररित्या डाऊनलोड करुन ती एका खाजगी वाहिनीवर प्रसारित केली होती. हा तरूण डार्कनेट वरील काही हॅकर्स सोबत संपर्कात असल्याचं आढळून आलं आहे. 'एमपीएससी'च्या संकेतस्थळावरुन परीक्षार्थीचे प्रवेश पत्र आणि परिक्षेची पश्नपत्रिका हॅक करण्यासाठी त्याला सुमारे ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचं तपासात आढळून आलं आहे.

****

कर्नाटक कॅडरचे १९८६ घ्या तुकडीचे आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांनी काल गुन्हे अन्वेषण विभाग सीबाआयचे संचालक म्हणून मुंबईत पदभार स्वीकारला. यापूर्वी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. सूद यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या भारतीय पोलीस सेवेच्या कार्यकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

****

फायझर कंपनीनं विकसित केलेल्या कोविड १९ साठीच्या पॅक्सलोविड या उपचारांना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं काल मान्यता दिली. पॅक्सलोविड ही प्रौढांना तोंडाद्वारे दिली जाणारी पहिली विषाणूविरोधी गोळी आहे. त्यामुळे ज्या प्रौढ रूग्णांमधे कोविड १९ ची गंभीर लक्षणं आढळतील त्यांना डॉक्टर ही गोळी घेण्याचा सल्ला आता देऊ शकतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारला आज नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापती म्हणून संजय पवार यांची निवड झाली आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी याबाबतची घोषणा केली.

****

इंडियन प्रिमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये बाद फेरीचा अखेरचा सामना आज सायंकाळी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडा मैदानावर हा सामना रंगेल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेमधून बाहेर पडेल, तर विजेत्या संघाची रविवारी चेन्नई सुपर किंग्जसोबत लढत होईल.

****

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे तर किदंबी श्रीकांतचं आव्हान उपांत्य पूर्व फेरीत संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंधूचा सामना उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झांग यी मान हिच्याशी झाला. त्यानंतर सिंधूनं काही झटपट निर्णय घेत सामन्यावर पकड घेतली आणि विजय मिळवला. तर प्रणॉयनं केंटा निशिमोटाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तब्बल ९० मिनिटं चाललेल्या सामन्यात प्रणॉयनं २५-२३, १८-२१ आणि २१-१३ असा विजय मिळवला.

****

No comments: