Sunday, 28 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 28.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

नवीन संसद भवन म्हणजे भारताच्या लोकशाहीचे मंदिर, आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. या संसद भवनातून देशाच्या नव्या संकल्पाचे दर्शन जगाला होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन संसद भवनाचा दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटन सोहळा सर्व राज्यातील खासदार आणि आमदार तसंच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संसद भवनात पार पडला. या सोहळ्याची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली, त्यानंतर संसद भवनाची माहिती देणारी चित्रफित आणि संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलची माहिती असलेली चित्रफितही यावेळी दाखवण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा संदेशांचं यावेळी वाचन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ रुपयांचे नाणे आणि टपाल तिकिट यावेळी जारी केलं. तसंच सर्व उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. 

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनात फलकाचे अनावरण करून देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी संसद भवनात प्रवेश करून सर्वप्रथम महात्मा गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत सेंगोलची स्थापना केली. नवीन संसद भवनाच्या बांधकामात सहभागी झालेल्या कामगारांचा मोदी यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आयोजित सर्व धर्म प्रार्थना सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय कॅबिनेट मंत्री अमित शहा, डॉ जितेंद्र सिंह, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंह ठाकूर, डॉ. मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सहभागी झाले होते.

***

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.

***

आजच्यामन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम या उपक्रमाचा उल्लेख करत यात सहभागी युवकांशी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तेथील संस्कृती, राहणीमान यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांना भेटी दिल्या असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्मृती प्रकल्प या ऑनलाईन संग्रहालयाला भेट देऊन जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्रं आणि कथांच्या माध्यमातून भारताचा गौरवशाली इतिहास पहावा. तसंच या संग्रहालयांना प्रत्यक्ष भेट देण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी नागरिकांना केलं. जलकुंभी या जलस्त्रोतांसाठी समस्या असलेल्या वनस्पतीपासून कागद तयार करणाऱ्या कुंभी कागज या स्टार्टअपचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या शिवाजी डोले यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावर कृषी पदविका घेऊन २० जणांचे पथक तयार करून वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या निष्क्रीय सहकारी संस्थेचं पुनरूज्जीवन केलं. जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे शिवाजी डोले हे प्रतिबिंब असल्याचं मोदी म्हणाले. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत असून त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अभिवादन केलं. तसंच चार जूनला संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्त संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्याचे प्रयत्न वाढवले पाहिजे असं मत व्यक्त केलं.

***

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टिका केली. संसदेच्या उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही. कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते गेलेलं असू शकेल. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. हा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता असे दिसत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

***

न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती रमेश धनुका यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे ४६ वे मुख्य न्यायाधीश आहेत. २६ मे रोजी केंद्र सरकारने धनुका यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली होती. दरम्यान, धनुका हे ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून मिळणार आहे.

***

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

//***********//

 

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...