Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
नीती
आयोगाच्या संचालन समितीची आठवी बैठक आज नवी दिल्ली इथं सुरू.
·
नवी
दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.
·
कर्नाटकात
नव्या सरकारमधील २४ मंत्र्यांना राज्यपालांनी दिली शपथ.
·
जागतिक
अर्थव्यवस्थेत भारतानं पाचवं स्थान मिळवल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची
माहिती.
आणि
·
राज्यासाठी
दोन हजार दोनशे सत्तर कोटी रूपयांच्या पुरवणी निधीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण
मंत्रालयाची मंजुरी.
****
नीती आयोगाच्या संचालन समितीची आठवी बैठक आज नवी दिल्ली
इथं सुरू आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यावर समूहाची भूमिका या संकल्पनेवर
या बैठकीत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या
या बैठकीत मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, महिला सक्षमीकरण,
आरोग्य आणि पोषण, कौशल्य विकास आणि गतीशक्ती यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी असून विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे
मुख्यमंत्री आणि राज्यपाल, केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी आहेत.
****
नवी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन उद्या सकाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त खास ७५ रुपयांचं नवं नाणं
जारी करण्यात येणार आहे. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास चारशे
खासदार बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की
बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एकशे एकावा
भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
कर्नाटकात काँग्रेसप्रणित नव्या सरकारमधील आणखी २४ आमदारांचा
आज मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या मंत्र्यांना
शपथ दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभा अध्यक्ष
यू. टी. खाडेर आणि मंत्रिमंडळातील अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते. या विस्तारानंतर
आता कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ३४ इतकी झाली आहे. याआधी २० मे रोजी
आठ मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
****
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा
अर्थव्यवस्था असलेला देश बनला असल्याचं केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. आज नवी दिल्ली इथं एका
राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
वैष्णव म्हणाले की, नऊ वर्ष सेवा, प्रशासन आणि गरीबांचं
कल्याण हे या परिषदेची संकल्पना आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. आता विकास आणि सामाजिक
क्षेत्राशी संबंधित प्रत्येक योजनेचा नव्या पद्धतीने विचार केला जातो ज्यामुळे लोकांच्या
जीवनात बदल झाल्याचं ते म्हणाले. सध्याच्या सरकारने सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय
आणि गरिबांचे सक्षमीकरण यावर भर दिल्याचंही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.
****
जी- ट्वेंटीच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची तीन दिवसीय
बैठक आज उत्तराखंडमधील टिहरी इथं पार पडली. मालमत्ता वसुली, फरारी आर्थिक गुन्हेगार,
माहितीच्या देवाणघेवाणीसाठी औपचारिक आणि अनौपचारिक सहकार्य, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा,
परस्पर कायदेशीर सहाय्य या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तीन
दिवस चाललेल्या या बैठकीला नऊ आंतरराष्ट्रीय संस्थांव्यतिरिक्त वीस सदस्य राष्ट्रे
आणि दहा निमंत्रित प्रतिनिधींसह ९० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
****
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी
औषध उद्योगाच्या झपाट्याने होत असलेल्या वाढीचं कौतुक केलं आहे. जागतिक स्तरावर भारताचं
महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी लाभदायी उत्पादन, गुणवत्ता आणि संशोधनाच्या गरजेवर त्यांनी
भर दिला.
नवी दिल्ली इथं औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रावरील
आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आज दुसऱ्या दिवशी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना आणि आगामी औषधी पार्कच्या
सकारात्मक परिणामांचा उल्लेख करून त्यांनी संबंधितांना विद्यमान संधींचा लाभ घेण्यास
सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजनेअंतर्गत
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं महाराष्ट्र राज्यासाठी दोन हजार दोनशे
सत्तर कोटीं रूपयांच्या पुरवणी निधीला मंजूरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी दिली.
यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहाशे बावन्न कोटी
तेरा लाख रूपये तर २०२३-२४ या वर्षांसाठी एक हजार सहाशे अठरा कोटी चोपन्न लाख रुपयांचा
निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातले सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय
अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त नवीन पदांना केंद्र
सरकारने मंजुरी दिली आहे.
****
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरवण्यात
आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्धाटन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज झालं. कृषी उत्पन्न
बाजार समितीनं महानगरपालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद शहरातल्या विविध भागात आंबा महोत्सव
सुरू करावा, तसंच आंब्यासोबतच अंजीर, सफरचंद यासारख्या अन्य फळ उत्पादकांना औरंगाबादमध्ये
बोलावून फळांचा महोत्सव घेण्यात यावा, अशा सूचना बागडे यांनी यावेळी दिल्या आहेत.
****
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी
पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे अध्यक्षपदी तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उत्तम
खांडबहाले उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले आहेत. आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी
नितिन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली.
****
नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या नांदेड- अमृतसर सचखंड
एक्सप्रेस आणि नांदेड - हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्कक्रांती एक्सप्रेस या गाड्यांच्या
मार्गात सोमवार आणि मंगळवारी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. जळगांव-मनमाड दरम्यान
नांदगांव रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे या गाड्या हिंगोली, अकोला,
भुसावळ मार्गे धावणार असल्याचं विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.
****
खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यासह राज्य आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय
पातळीवर उंचवावं, असं आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केलं
आहे. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात येत असलेल्या दोन कोटी ९१ लाख रुपयांच्या
विविध सुविधांच्या कामांचं भूमीपूजन दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा विभागानं जिल्ह्यात राज्यपातळीवरील विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी
प्रयत्न करावेत यासाठी सामाजिक दायित्त्व फंडातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी
ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली.
****
जालना शहरातल्या क्रिस्टल बिझनेस सेंटरमध्ये आजपासून तीन
दिवसीय विज्ञान छंद शिबिराला सुरुवात झाली. जालना एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीनं जुलै
महिन्यात विज्ञान शोधवाटिका -सायन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या शोधवाटिकेतील
अभ्यासक्रमासह दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावे
या उद्देशानं हे शिबीर घेण्यात येत आहे
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात आज छत्रपती शाहू
महाराज युवाशक्ती रोजगार शिबिर घेण्यात आलं. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि
महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं
या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत. शिक्षण आणि अभ्यासक्रम तसंच, भविष्यातील रोजगाराच्या
संधी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज प्रक्रिया आदी विषयावर तज्ज्ञांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या
जयंतीदिनानिमित्त उद्या राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल
रमेश बैस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे
माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत बोरीवली इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
चित्र प्रदर्शनाचं उद्घघाटन करण्यात येणार आहे.
****
भारताचा बॅटमिंटनपटू एच.एस. प्रणॉय यानं मलेशिया मास्टर्स
स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली, तर पी. व्ही. सिंधू हिला स्पर्धेतील एकेरी
सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. विजेतेपदासाठी प्रणॉयचा अंतीम सामना चायनीज तैपेईच्या
लिन चू यी किंवा चीनच्या वेंग हाँग यांगशी होईल. दरम्यान, उपांत्य फेरीत पी. व्ही.
सिंधूला इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं २१-१४, २१-१७ ने पराभूत केलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम
सामना अहमदाबादमध्ये उद्या संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात
होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा
६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली आहे.
****
No comments:
Post a Comment