Saturday, 27 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 27.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

·      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता

·      एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

·      राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना

·      केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी महोत्सवाचं आयोजन

·      परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव

सविस्तर बातम्या

येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले

 

Byte…

आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.

 

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....

 

Byte…

हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा  महामार्ग आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

****

दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.

दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.

****

शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.

जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,

 

Byte…

आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.

 

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन- हा कार्यक्रम होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेली रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती म्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

****

औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...

 

Byte…

हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.

****

उस्मानाबाद हा जिल्हा केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

 

Byte..

यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.

****

परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.

****

माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जणांनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.

****

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...