Monday, 1 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यपालांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं हे ३५० वं वर्ष असून, यानिमित्त दोन ते नऊ जून या कालावधीय शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान, स्वातंत्र्यवीर गौरव दिन आदी राज्य शासनाचे निर्णय त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र दिनासोबतच कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. कामगार दिनानिमित्त राज्यामध्ये विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचं सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, या माध्यमातून जिल्ह्यातल्या ७५ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं. जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.

यावेळी भुमरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि विहीत विभागाच्या १७ उमेदावारांना नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले. 

****

उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

**

नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी पोलिस संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. विविध पुरस्कारांचं महाजन यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं.

**

बीड इथे सहकार मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस दलाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण केलं. विशेष पुरस्कार विजेते पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध पुरस्कारांचं वितरणही सावे यांच्या हस्ते करण्यात आलं.

**

हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंगोली जिल्ह्याच्या विकासात शासन स्तरावरून सातत्याने उपाययोजना केल्या जात असून, विकास कामांमध्ये कुठलाही गतिरोधक येऊ देणार नाही,सं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

**

जालना इथे पोलिस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते, परभणी इथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते, तर लातूर इथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

**

महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आज ऑनलाईन पद्धतीने राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन झालं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातही आज आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ झाला. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असून, गर्भवतींसंदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक आपला दवाखाना सुरु होआहे.

जालना जिल्ह्यात २० शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसंच आठ "आपला दवाखाना' कार्यान्वित करण्यात येत आहेत.

****

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आज १७१ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत मुंबईत १ एक हजार ८०८ रुपये ५० पैसे असणार आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींमध्ये सध्या कोणताही बदल झाला नाही.

****

महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानाबर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.

//**********//

No comments: