Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना
२०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात
आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये
देणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये
सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित
जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण,
मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही
काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया
पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये
तीन पूर्णांक आठ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार
पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आपल्या
प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक
बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७०
टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात
नमूद केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या
५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे
राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या
सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण
गांधी यांचं आज कोल्हापुरात
निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स
फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी
संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर
जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण
बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा
दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांचं आत्मचरित्र
'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या
नव्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय
घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह
विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने
आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी,
अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी
केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून
शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर
मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला.
****
परभणी
इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी
केली. या रुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे,
असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. विद्युत उपकरणं,
स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था
काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा
नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन
आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे.
सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या
ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात
११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ
तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं
वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
No comments:
Post a Comment