Wednesday, 3 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 03.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, सं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.

****

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं काल दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेच्या शिफारशी जारी केल्या. अलीकडच्या दशकात सरकारने व्यवसाय सुलभ करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. ट्राय ने २०२१ मध्ये दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेवर एक मार्गदर्शक पत्रिका तयार केली होती. यात वापरकर्ता-अनुकूल, पारदर्शक आणि प्रतिसादात्मक डिजिटल एक खिडकी आधारित पोर्टल सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे पोर्टल आंतर-विभागीय ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्याकरता नवीन डिजिटल तंत्रज्ञानासह सक्षम केलं जाईल, असं म्हटलं आहे.

****

भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.

****

जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली त्यांची भूमिका यावर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. "अधिकारांचे भविष्य घडवणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य" ही यंदाची पत्रकार स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे.

****

देशात गेल्या २४ तासात तीन हजार ७२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सात हजात ६९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार १७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के आहे.

****

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलट गणतीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगानं योग दिनाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार विभागानं काल योग महोत्‍सवआयोजित केला होता. आंतराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या ५० दिवस आधी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाटक, पथनाट्य अशा माध्यमातून योगासनाचं सादरीकरण करण्यात आलं. सोलापूर, पालघर याठिकाणीही केंद्रीय संचार विभागानं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

****

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगानं काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेतली. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत देशातल्या सगळ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला क्रमांक मिळावा, या उद्दिष्टानं ही बैठक घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये नदी आणि नाल्यांची स्वच्छता, कचरा प्रक्रिया केंद्राचं व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा मुक्त शहर, सांडपाणी व्यवस्थापन, हेल्पलाईन, दंड आकारणी, सार्वजनिक शौचालयं, या मानकांवर गुण दिले जातील, अशी माहिती स्वच्छ भारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आस्थापना कर लागू केल्यास शहरातले सगळे व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे. या करासंदर्भातला व्यापाऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री, सहकारमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पारधी समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशीव इथं काल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. धाराशीवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार हे शिबिर घेण्यात आलं. पारधी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि इतर कागदपत्रं अद्ययावतत करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

//**********//

No comments: