Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
· नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील
घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटीवर आधारित प्रकल्प राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
जितेंद्र आव्हाड यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा.
· ‘द केरला स्टोरी या चित्रपटावर
बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
आणि
· धाराशिव इथं येत्या शुक्रवारी
राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन.
****
राज्यातल्या सर्व नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थामधील घनकचरा प्रक्रियेसाठी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान -आयसीटीवर
आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून ५७८ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात
आले आहेत. तसंच घनकचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांवर
लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस किंवा आयसीटी आधारित तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात येणार
आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी
करण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या रस्त्यांच्या
गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तींसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास
महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महामंडळाचे भागभांडवल
१०० कोटी रुपये राहणार असून, यापैकी ५१ टक्क्यांचा शासकीय निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध
करून दिला जाणार आहे.
****
कांदळवन आणि सागरी जैवविविधता
या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना
तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत
या निर्णयाला मान्यता देण्यात आली. यापैकी तीस टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात
आल्या आहेत. यात पदव्यूतर पदवीसाठी पंधरा आणि पीएचडीसाठी दहा अशा एकूण दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना
याप्रमाणे तीन वर्षे शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. पदव्यूत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे
वय ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी ४० वर्षे असावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट
देण्याचं आवाहन कांदळवन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
करमणूक शुल्क आकारणीमध्ये
सूट देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून
वस्तू आणि सेवा कर -जीएसटी अधिनियम लागू करण्यात आला. या तारखेपासून ते ३० सप्टेंबर,
२०२६ या कालावधीपर्यंत करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यात येणार आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ
तालुक्यातील जयसिंगपूर इथंल्या मौजे उदगांव इथं ३५० खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय
स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी १४६ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीला
मंजुरी देण्यात आली आहे.
****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं.
मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या
उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून,
या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल,
असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी
घोषणाही चंद्रा यांनी केली.
****
भारतीय
जनता पक्षाच्या नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
यांनी आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या कार्यकारिणीत
१६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य
आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. सरचिटणीसपदी आमदार रणधीर सावरकर, विधिज्ञ
माधवी नाईक, संजय केनेकर, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी
आमदार मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. मराठवाड्याच्या विभागीय संघटनमंत्रीपदी संजय कौडगे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं
स्पष्ट केलं आहे. पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा
दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अध्यक्षपद सोडण्याची
घोषणा केल्यानंतर आव्हाड यांनी हा निर्णय घेतला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा
अशी मागणी आव्हाड यांनी केली. ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचे राजीनामे
दिले असल्याचं आव्हाड यांनी ट्विट करत जाहीर केलं आहे.
दरम्यान,
पक्षानं अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी शुक्रवारी बैठक घ्यावी, अशी सूचना
खासदार शरद पवार यांनी केली आहे. या बैठकीत जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य
असेल असं, पवार यांनी सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चित्रपट
रसिकांना आपल्या आवडीच्या चित्रपटांच्या डिजिटायझेशनसाठी आता निधी उभारता येणार आहे.
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती
दिली. सरकार लवकरच वारसा चित्रपटांची एक यादी जाहीर करेल, त्या यादीतून चित्रपट रसिक
आपल्या आवडीच्या चित्रपटाचं डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यासाठी निवड करू शकतील. सरकारने
पाच हजारावर चित्रपट आणि लघुपटांच्या डिजिटायझेशनचं उद्दीष्ट निर्धारित केलं आहे. यापैकी
सुमारे अडीच हजार चित्रपटांचं डिजिटायझेशन झाल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.
****
‘द
केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली
आहे. केरळमधली डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर हेट स्पीच - द्वेषपूर्ण
भाषणाला चालना देण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर
तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या
प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. न्यायालय या चित्रपटावर कोणताही शिक्का लावू शकत नाही.
चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर योग्य व्यासपीठावरून
प्रयत्न करावेत असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ‘द केरला स्टोरीवर बंदीची मागणी
फेटाळून लावली.
****
धाराशिव
इथं येत्या शुक्रवारी या वर्षीच्या राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र गोवा वकील परिषद आणि उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
ही परिषद घेण्यात येणार आहे. यात “जलद न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण” या विषयावर
चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात ई कामकाजासाठी
संगणक, छपाई यंत्र तसंच आवश्यक साहित्य भेट दिले जाणार आहे. राज्यभरातून जवळपास तीन
हजार विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
नाशिक
जिल्ह्यातील मनमाड इथंल्या आईसाहेब स्वयंसहायता बचत गट दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावरील
बारा हजार लीटर दूध अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आज नष्ट केलं. विभागाला मिळालेल्या
माहितीच्या आधारे ही कारवाई करत असताना दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘व्हे’
ही पावडर त्या ठिकाणी आढळली, त्यामुळे भेसळीच्या संशयावरून दूध नष्ट करण्यात आले.
छत्रपती
संभाजीनगर इथं बुद्धिस्ट फाऊंडेशनच्या वतीनं दोन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा
होणार आहे. शहरातल्या महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात तीन आणि चार मे रोजी
सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्याग, समर्पण आणि राष्ट्रप्रेम याचं मूर्तीमंत
उदाहरण असल्याचं, प्रसिद्ध अभिनेते तथा विचारवंत शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. ते
आज अंबाजोगाई इथं वि.दा.सावरकरांचे जीवन आणि विचार दर्शन या विषयावर बोलत होते. स्वातंत्र्यवीर
सावरकरांच्या विविध पैलूंचे दर्शन पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना
घडवलं.
****
भारतीय
जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन
करण्यात आलं. धाराशिव इथं व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातही अभिवादन सभा घेण्यात
आली. संस्थेचे सदस्य कमलाकर पाटील यांनी महाजन यांच्या स्मृतींना उजाळा देताना, अभ्यासपूर्ण
वक्तृत्व शैलीतून स्वतःची ओळख निर्माण केलेले महाजन यांच्याकडे भारतीय राजकारणातील
एक महत्त्वाचे नेते म्हणून पाहिले जात होतं, असं सांगितलं.
****
No comments:
Post a Comment