Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची
घोषणा;पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पुनर्विचार करण्याचं आश्वासन
·
खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची
मागणी
·
न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा-केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू
·
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा
राज्य सरकारचा विचार
·
धाराशिव जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं-पालकमंत्री
तानाजी सावंत यांचं आवाहन
·
मराठवाड्यात काल पुन्हा पाऊस; परभणीत घर कोसळून बालकाचा मृत्यू
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा गुजरात टायटन्सवर पाच धावांनी
विजय
****
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त
होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय
आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं, या समारंभात त्यांनी, पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा
निर्णय अचानक जाहीर केला. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोणतीही नवी
जबाबदारी घेणार नसल्याचं पवार यांनी जाहीर केलं. ते म्हणाले...
‘‘एक मे एकोणीसशे साठ ते
एक मे दोन हजार तेवीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू
नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.’’
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी
हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना
पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून,
ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष
सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या
मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले...
‘‘काळानुरूप काही निर्णय
घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला
का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या
अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये
फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं
पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन
होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार
आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.’’
मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला
जवळपास सगळ्याच
नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची
मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा
दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं,
अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून
दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया, महाविकास
आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना, शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर
होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार
यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.
शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय
असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही,
अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष
ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या
तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला
आहे. ते काल गडचिरोली इथं माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा,
असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्या पार्श्वभूमीवर
फडणवीस बोलत होते. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा
आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असल्याची
टीका फडणवीस यांनी केली.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी
खारघर इथं झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत
करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्द्यांवर विधीमंडळाचं
विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, काँग्रेस पक्षानं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश
बैस यांची राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल
आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या माहितीच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
भरीव मदत द्यावी, पंचनाम्यांसाठी थांबू नये, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
****
फाशीच्या शिक्षेसंदर्भातल्या
पर्यायांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर काल याबाबत झालेल्या
सुनावणीत, ॲटर्नी जनरल- महान्यायवादी आर वेंकटरमणी यांनी यासंदर्भातले दस्तावेज सादर
केले. विधीज्ञ ऋषी मल्होत्रा यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी फाशीऐवजी कमी त्रासदायक
पर्याय अवलंबण्यासाठी एका याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्राणघातक इंजेक्शन,
बंदुकीची गोळी झाडणं, विजेचा झटका किंवा विषारी वायू कक्ष, आदी पर्याय संबंधितांनी
सुचवले आहेत, या याचिकेवर पुढची सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे.
****
न्यायव्यवस्थेत
भारतीय भाषांचा वापर वाढावा असा केंद्र सरकारचा मानस असून, आधुनिक
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढवण्याच्या दिशेनं पावलं उचलत
असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ई प्रणाली संचाचं उद्घघाटन काल
रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात
सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रिजिजू यांनी
सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यावेळी उपस्थित होते. न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं
मार्गी लावणं तसंच सर्वसामान्यांना
न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
महात्मा गांधी यांचे नातू आणि
लेखक अरुण गांधी यांचं काल कोल्हापूर इथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक राजकीय
कार्यकर्ते असलेल्या अरुण गांधी यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर मध्ये अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
डॉ. सुनीती देव यांचं काल नागपूर इथं आजारपणानं निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या.
नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून
निवृत्त झाल्यानंतर डॉ. देव यांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता.
सामाजिक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमधून सातत्याने लेखन केलं. त्यांच्या पार्थिव
देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा
चौदावा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थ्यांचं
बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची
सुविधा टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ
घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय
महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची
माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या,
दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांचं, महाजन यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं,
त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी
शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून, येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची
भरती केली जाईल, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी
आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी
सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात
आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन काल सत्तार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबीन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये
होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कमी पर्जन्यमान असलेल्या धाराशीव
जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन, पालकमंत्री
तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिव इथं खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत
होते. जिल्ह्यात निकृष्ट बियाणं, भेसळयुक्त खतं आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची
गय केली जाणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला. ज्या बॅंका खरीप पिकांसाठी कर्जवाटपाचे
लक्ष्यांक साध्य करणार नाहीत आणि सिबिल स्कोअरच्या नावाखाली कर्ज देण्यास टाळाटाळ करतील,
अशा बॅंकांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं कार्यवाही प्रस्तावित करावी, असे निर्देश
सावंत यांनी दिले.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत
महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीनं स्थापन केलेल्या, गौरव
समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या
बैठकीत, या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
पुढील मुक्तिसंग्राम दिनापर्यंत, विविध कार्यक्रमांची आखणी करताना, समाजातले विविध
घटक त्यामध्ये सहभागी होतील, असं नियोजन करण्याची सूचना चव्हाण यांनी केली. मे महिन्याच्या
दुसऱ्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन कार्यक्रमांचं वेळापत्रक निश्चित
होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत काल नांदेड इथं बोलतो मराठी-गर्जतो
मराठी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्याचं आवाहन खासदार प्रताप
पाटील चिखलीकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या कल्लाळी, इस्लापूर, उमरी, यासारख्या ऐतिहासिक
ठिकाणी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुक्तीलढ्याचा इतिहास पोहोचवत
असल्याचं, चिखलीकर यांनी सांगितलं.
****
राज्यात छत्रपती शाहू महाराज
युवाशक्ती करिअर शिबीरांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी ही माहिती दिली. राज्यात ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसंच सर्व २८८ मतदारसंघांत
येत्या सहा मे पासून सहा जून पर्यत हे शिबीर घेतलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध
असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे.
****
मराठवाड्यात परभणी, हिंगोली,
नांदेड जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या चुडावा
शिवारात काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं आखाड्यावरील घर कोसळून
एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरात काल रात्री अवकाळी
पाऊस झाला. नांदेड शहरातही आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. काल सायंकाळी सुमारे अर्धा
तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
काही भागाही काल रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
****
दरम्यान, येत्या पाच तारखेपर्यंत
मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या
कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान
केंद्रानं वर्तवला आहे. चार मे रोजी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं गुजरात
टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १३१
धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ निर्धारित षटकात सहा गडी गमावत १२५
धावाच करु शकला.
या स्पर्धेत आज दुपारी साडे तीन
वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्न सुपर किंग्ज यांच्यात, तर संध्याकाळी साडे सात वाजता
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे.
****
बारावीनंतर तांत्रिक शिक्षण घेऊन
एखादी परदेशी भाषा शिकल्यास बारावी पास विद्यार्थ्यांनाही परदेशामध्ये अनेक प्रकारच्या
संधी उपलब्ध असतात, असं मत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम
वाघ यांनी व्यक्त केलं आहे. परदेशातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, या विषयावर छत्रपती
संभाजीनगरातल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात काल झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत
ते बोलत होते. काळानुसार झालेले बदल स्वीकारले तर संधी चालून येते, असं सांगत, जपान,
जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांमध्ये भारतातल्या विद्यार्थ्यांना आरोग्य,
कृषी, बांधकाम तंत्रज्ञान, अन्न आणि भाज्या तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात संधी
उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment