Thursday, 4 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 04.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात क्रेरी भागातल्या वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं पायन परिसरात घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. संयुक्त पथक संशयित घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि एका पिस्तूलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

****

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल देशातलं अवयवदान धोरण आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि मंत्रालयाचे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, २०१३ मध्ये वर्षाला पाच हजारापेक्षाही कमी असलेलं प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचं प्रमाण, २०२२ मध्ये १५ हजारांपेक्षाही जास्त झालं आहे. या क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतराराष्ट्रीय मानकांचा अभ्यास करून ती कार्यान्वित करावीत, अवयवदान आणि प्रत्यारोपण याबाबत रुग्णालयांना उपयुक्त आणि दिशादर्शक ठरेल अशी मार्गदर्शक नियमावली पुस्तिका तयार करावी, प्रत्यारोपण समन्वयकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावा, अशा सूचना मांडवीय यांनी यावेळी दिल्या.

****

लोकसंख्येवरील उष्णतेचा प्रभाव मोजण्यासाठी, आणि विशिष्ट स्थानांसाठी प्रभाव-आधारित उष्मा लहरी सूचना निर्माण करण्यासाठी, भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक सुरु करणार आहे. भारतीय हवामान विभागानं गेल्या आठवड्यात देशाच्या विविध भागांसाठी प्रायोगिक उष्णता निर्देशांक जारी करण्यास सुरुवात केली. हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन ते खरोखर किती गरम आहे ते या निर्देशांकाद्वारे निर्धारित करण्यात येतं. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तापमान आणि आर्द्रतेपासून, ते वारा आणि प्रभावाचा कालावधी यांसारख्या इतर बाबी या निर्देशांकात एकत्रित असतील. लोकांसाठी उष्णतेच्या ताणाचा तो प्रभावी सूचक असेल. धोक्याचा गुणांक सुमारे दोन महिन्यांत तयार होईल आणि तो पुढील उन्हाळ्याच्या हंगामात कार्यान्वित होईल असंही महापात्रा यांनी सांगितलं.

****

देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ९६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सात हजार ८७३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३६ हजार २४४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लसींची मात्रा घेतलेल्यांची संख्या २२० कोटी ६६ लाख इतकी झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या दहा विद्याशाखांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा - सीईटी २०२३ साठी अर्ज भरण्यास सहा मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. साडेतेराशेपेक्षा अधिक जागांसाठी २२ ते २४ जुलै दरम्यान ही परिक्षा होणार आहे. या सीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका एक ऑगस्ट, तर निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज भरता येतील.

****

परभणी जिल्ह्यातयोजना जन कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी’, या शासकीय योजनांच्या जत्रा कार्यक्रमाअंतर्गत, जिल्ह्यातल्या कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, आणि एच एल एल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं सात मे पर्यंत जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करायचे आहेत.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, आदी ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचं मोठं नुकसान झालं.

****

या आठवड्यात बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मोचा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग, त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं बचाव, मदतकार्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. इकडे महाराष्ट्रात,अनेक ठिकाणी सहा मेपर्यंत जोराचे वारे, वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

//**********//

No comments: