Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ
स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या घनकचरा
प्रक्रियेसाठी आय सी टी आधारित प्रकल्प राबवण्यात येणार
·
अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्सचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणार
·
‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
·
दुय्यम निबंधक कार्यालयांचं कामकाज शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही सुरू
·
धाराशिव इथं उद्या राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय; तर लखनौ सुपर
जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पावसामुळे रद्द
****
राज्यातल्या रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण,
वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन
करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या महामंडळाचं भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार
असून, यापैकी ५१ टक्क्यांचा शासकीय निधी टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिला जाणार आहे.
**
राज्यातल्या सर्व नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थामधल्या घनकचरा प्रक्रियेसाठी, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान -आय सी
टी वर आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून,
५७८ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. घनकचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांवर लक्ष
ठेवण्यासाठी, जीपीएस किंवा आयसीटी आधारित तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी
करण्यात येणार आहे.
**
कांदळवन आणि सागरी जैवविविधता
या विषयात जगभरातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी, पंच्याहत्तर
विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला
मान्यता देण्यात आली. यापैकी तीस टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
यात पदव्युत्तर पदवीसाठी पंधरा आणि पी एच डी साठी दहा अशा एकूण दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना, तीन वर्षे
शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचं वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल ४० वर्षे असावं. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कांदळवन
प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
**
करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट
देण्याचा निर्णयही कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला. राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर -जीएसटी अधिनियम लागू
करण्यात आला. या तारखेपासून ते ३० सप्टेंबर, २०२६ या कालावधीपर्यंत करमणूक शुल्क आकारणीमध्ये
सूट देण्यात येणार आहे.
**
कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ
तालुक्यातल्या जयसिंगपूर इथल्या मौजे उदगांव इथं, ३५० खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन
करण्यात येणार आहे. कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत
यासाठी १४६ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
****
सरकार लवकरच
अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्सचा शालेय
अभ्यासक्रम समावेश करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं.
काल मुंबईत भारतीय वाणिज्य आणि उद्योग
महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते
बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात
जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक
मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची
स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
दरम्यान, चित्रपट रसिकांना आपल्या आवडीच्या चित्रपटांच्या डिजिटायझेशनसाठी
आता निधी उभारता येणार असल्याची माहिती, चंद्रा यांनी दिली. सरकार लवकरच
वारसा चित्रपटांची एक यादी जाहीर करेल, त्या यादीतून चित्रपट रसिक आपल्या आवडीच्या
चित्रपटाचं डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यासाठी निवड करू शकतील. सरकारने पाच हजारावर
चित्रपट आणि लघुपटांच्या डिजिटायझेशनचं उद्दीष्ट निर्धारित केलं आहे. यापैकी सुमारे
अडीच हजार चित्रपटांचं डिजिटायझेशन झाल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.
****
चांगला आशय हीच मनोरंजनाच्या बाजारपेठेची
गुरुकिल्ली आहे, असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते काल फिक्कीच्या
कार्यक्रमात बोलत होते. चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती आणि त्यांचं प्रभावी प्रसारण
आजच्या स्पर्धेच्या युगात महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. दूरदर्शन नवीन कल्पनांसह
पुढे येत असून, हा बदल
त्यांच्या आगामी चार महिन्यांच्या कार्यक्रमातून दिसून येईल, असं द्विवेदी यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालयं,
पंचतारांकीत हॉटेल, शाळा, देवस्थानं यावर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून संरक्षणात्मक उपाययोजना
सुचवणारा अहवाल, तज्ज्ञ
समितीनं काल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. या अहवालात मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या
सुरक्षेचं विश्लेषण करण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात
आल्या आहेत.
****
शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण
भागातल्या रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी, आशियाई एशियन
इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केलं आहे. बँकेच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प कार्यान्वित झाले तर शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारं,
महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना
देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरवण्याबाबत, बार्टी,
टी आर टी आय, महाज्योती आणि सारथी, या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ही माहिती
दिली. पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह
उपलब्ध व्हावेत, यासाठी वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती द्यावी, ज्या विद्यार्थ्यांना
वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्यांकरता ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर, प्रतिमहा सहा हजार रुपये १० महिन्यांसाठी देण्याचा
निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे
सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाण्यातल्या
सर्व पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याचं, आव्हाड यांनी ट्विट करत
जाहीर केलं आहे.
दरम्यान, पक्षानं अध्यक्षपदासाठी
जी समिती नेमली आहे त्यांनी शुक्रवारी बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी
केली आहे. या बैठकीत जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असं, पवार यांनी सांगितल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती पक्षानं
केली असल्यामुळे, त्यांच्या
जागी कोणाची निवड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
पवार यांनी आपला निर्णय कायम ठेवला तरी ते पक्षाचे सर्वेसर्वा, पक्षाची ओळख, आणि चेहरा
राहतील. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी ते सार्वजनिक जीवनात कायम सक्रीय राहणार असल्यानं,
राज्यातल्या महाविकास आघाडीला कसलाही फटका बसणार नाही, असं पटेल यांनी सांगितलं.
****
खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमध्ये लुडबुड करू नये, ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते
नाहीत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी काँग्रेस
संदर्भात केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना नाना पटोले काल नागपूर इथं बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर संजय
राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजूर्न खरगे आहेत मात्र निर्णय राहुल गांधीच घेतात,
असं म्हटलं होते. त्यावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबावरील
प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये असं पटोले यांनी म्हटलं आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप सोबत गेली तरीही आम्ही भाजपविरोधात लढू असंही पटोले म्हणाले.
****
‘द केरला स्टोरी या चित्रपटावर
बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केरळमधली डावी लोकशाही
आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर हेट स्पीच - द्वेषपूर्ण भाषणाला चालना देण्याचा
आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीनं सुनावणी
घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या प्रदर्शनाला
परवानगी दिली असून, न्यायालय या चित्रपटावर कोणताही शिक्का लावू शकत नाही, चित्रपट
प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर योग्य व्यासपीठावरून प्रयत्न
करावेत, असं न्यायालयानं सांगितलं.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था -आयआयटी
प्रवेशा परीक्षेसाठी पात्रता गुणांच्या निकषात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. आयआयटी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणाची अट शिथील करण्यासंदर्भात दाखल याचिका
फेटाळून लावताना यासंदर्भात विचार करणं तसंच निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा असल्याचं
नमूद केलं आहे.
****
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य
कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार
दिला आहे. कोचर यांनी बँकेकडून निवृत्तीच्या लाभासंदर्भात ही याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने कोचर यांच्यावरील कारवाई योग्य ठरवत, कोणताही दिलासा देण्यास नकार दिला
आहे.
****
जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका
क्षेत्रातल्या दुय्यम निबंधक कार्यालयांचं कामकाज शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही
सुरू राहणार असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दुय्यम
निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, नागरिकांना सुटीच्या दिवशीही
दस्त नोंदणी करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या सुविधेचा लाभ घेण्याचं
आवाहन विखे पाटील यांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं उद्या या वर्षीच्या राज्यस्तरीय वकील
परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र गोवा वकील संघटना आणि उस्मानाबाद जिल्हा
वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद घेण्यात येणार आहे. यात “जलद न्यायासाठी
न्यायव्यवस्थेचं आधुनिकीकरण” या विषयावर चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातल्या
सर्व न्यायालयात ई कामकाजासाठी संगणक, छपाई यंत्र तसंच आवश्यक साहित्य भेट दिले जाणार
आहे. राज्यभरातून जवळपास तीन हजार विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय
स्वातंत्र्य लढ्यात त्याग, समर्पण आणि राष्ट्रप्रेम याचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचं,
प्रसिद्ध अभिनेते तथा विचारवंत शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं वि.दा.सावरकरांचे
जीवन आणि विचार दर्शन, या विषयावर बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध पैलूंचं
दर्शन पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना घडवलं.
****
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते
प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं व्यंकटेश महाजन वरिष्ठ
महाविद्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली. संस्थेचे सदस्य कमलाकर पाटील यांनी महाजन यांच्या
स्मृतींना उजाळा देताना, अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीतून स्वतःची ओळख निर्माण केलेले
महाजन यांच्याकडे भारतीय राजकारणातले एक महत्त्वाचे नेते म्हणून पाहिले जात होतं, असं
सांगितलं.
****
इंडियन प्रिमियर
लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली इथं झालेल्या सामन्यात
मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या
संघानं दिलेलं २१५ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सनं एकोणिसाव्या षटकात चार गडी गमावत
पूर्ण केलं.
तत्पूर्वी काल लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना
पावसामुळे रद्द करण्यात आला. चेन्नई सुपर
किंग्जनं नाणेफेक जिंकून लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. लखनौ संघानं एकोणीस षटकं आणि दोन चेंडूत सात गडी गमावत १२५ धावा केल्या.
मात्र यावेळी पावसामुळे थांबवावा लागलेला सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही
संघांना एक-एक गुण देण्यात आला.
****
ताश्कंद इथं आशिया चषक धनुर्विद्या
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूंनी रिकर्व्ह आणि कंपाउंड विभागातल्या चारही
सांघिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष रिकर्व्ह संघाचा उद्या शुक्रवारी सुवर्णपदकासाठी चीनच्या खेळाडूंशी
सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त
आयुक्त जी.श्रीकांत यांनी काल प्रभारी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या कडून पदभार
स्वीकारला. त्यांनतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. कार्यालयात स्मार्ट
वर्क करून ई प्रशासनाकडे वळलं पाहिजे, याकरता प्रत्येक विभागाने एक ध्येय ठरवून त्या
दिशेनं काम करावं, असं आवाहन, जी. श्रीकांत यांनी केलं.
****
येत्या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात वृक्ष
लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी, यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी
केलं आहे. हर घर नर्सरी उपक्रमातून प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने, किमान ५० रोपे तयार करायची आहेत. या
उपक्रमात शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनीही कृतीशील सहभाग नोंदवावा, प्रत्येक शासकीय कार्यालयात पाच हजार रोपांची रोपवाटिका
तयार करावी, स्थानिक प्रजातींच्या रोपांची प्राधान्यानं निर्मिती करावी, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी
केल्या आहेत.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातले कर्मचारी रमेश शिंदे यांना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण
पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. या यशाबद्दल महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य
अभियंता सचिन तालेवार, आदींनी शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment