Thursday, 4 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 04.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसंख्येवरील उष्णतेचा प्रभाव मोजण्यासाठी आणि विशिष्ट स्थानांसाठी प्रभाव-आधारित उष्मा लहरी सूचना निर्माण करण्यासाठी भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक सुरु करणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महनिदेशक एम महापात्रा यांनी ही माहिती दिली. हवामान विभाग यासंदर्भात काम करत असून, पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उष्णता निर्देशांक जारी होईल, असं त्यांनी सांगितलं. या निर्देशांकाच्या माध्यमातून हवा आणि वादळाची देखील माहिती मिळेल, असं ते म्हणाले.

****

२०२३ च्या खरीप मोहिमेसाठी आयोजित कृषीविषयक राष्ट्रीय परिषद काल नवी दिल्ली इथं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत पार पडली. कृषी क्षेत्रापुढच्या आव्हानांचा प्रभावीरित्या सामना करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानांचा स्विकार करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीच्या वापराला प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

****

देशांतर्गत उद्योगांना अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी सरकार उत्पादनांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत असल्याचं, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत गुणवत्ता नियंत्रण आदेश, ड्रोन आणि इलेक्ट्रिक वाहन चाचणीच्या मुद्द्यांवर माध्यमांना संबोधित करत होते. सरकार चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्याचा विचार करत असल्याचं गोयल यांनी सांगितल.

****

गृह मंत्रालयानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या कर्मचाऱ्यांच्या जेवणात भरड धान्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० टक्के भरड धान्य वापरण्यात येणार असून, त्या दृष्टीनं केंद्रीय पोलीस कल्याण भांडाराच्या परिसरातल्या किराणा दुकानांसह शिधा वाटप दुकानांमध्येही, भरड धान्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं, गृह मंत्रालयानं सांगितलं.

****

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आणखी एक सीलबंद तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर सरन्यायाधीशांनीही नवीन तक्रार तपास अधिकाऱ्यांकडे द्यायला सांगितलं आहे.

****

No comments: