Tuesday, 6 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 06.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 June 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जून २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचं प्राधान्य-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; मराठवाड्यात पर्यावरण दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

·      किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा

·      दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार

·      ्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन; ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      जालना कृषी उत्पन्न बाजार समिती हरभरा खरेदी केंद्राला आग लागून मोठं नुकसान

·      अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्यासह एक कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आणि

·      आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांतला दहा मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्ण पदक

****

पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचं प्राधान्य असून, राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट, हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या पुरस्कारांचं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्या नागपूर, मुंबई, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, औरंगाबाद, रत्नागिरी आणि नाशिक या शहरात, सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या ठिकाणी प्रामुख्याने टाकाऊ वस्तूंवर पुनर्वापरासाठीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ग्रामपंचायत विभागात नांदेड जिल्ह्यातल्या जवळगावला द्वितीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्याच कुंडलवाडी नगरपरिषदेला विभागीय स्तरावरचं एक कोटी रुपयांचंक्षीस जाहीर झालं आहे. याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांना विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याचा बहुमान मिळाला आहे.

****

जागतिक पर्यावरण दिन काल सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

औरंगाबाद इथं सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थित सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ देण्यात आली.

विटखेडा परिसरात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवरच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. काल या परिसरात शंभर रोपं लावण्यात आली असून, एक हजार झाडं लावण्याचा संकल्प विटखेडा वॉर्डातल्या नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.

**

लातूर जिल्ह्यात हर घर नर्सरीउपक्रमाअंतर्गत सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी काल सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक वृक्षांचं बीसंकलन करण्यात आलं.

**

परभणी इथल्या वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला. वातावरणातल्या बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांवर उपाय शोधण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन संशोधन करण्याचं आवाहन, अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले यांनी यावेळी केलं. प्लास्टिकच्या वापरावर तसंच उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाची त्यानीं माहिती त्यांनी दिली.

क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी यावेळी बोलताना, निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा उद्देश आत्मसात करण्याचं आवाहन केलं. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

**

पर्यावरणासाठी वृक्ष लागव महत्त्वाची असल्याचं, हिंगोली इथल्या जॉइन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष किरण लाहोटी यांनी म्हटलं आहे. काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसंच सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, वैद्यकीय सुविधा यासह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून जवळपास दोन हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवन इथं या तिकिटाचं प्रकाशन होणार आहे.

****

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.

****

राज्यातल्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली. ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन व्हावं, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी, या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचं, राणे यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ नुसार शैक्षणिक घटकांचा आढावा घेऊन राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी, सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, या समितीत ३२ सदस्यांचा समावेश आहे. येत्या काळात शालेय शिक्षणासाठीचा अंतिम आराखडा, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आराखडाही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यानुसार येत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही पुरवणी परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना उद्या सात जून ते १७ जून दरम्यान नियमित शुल्कासह आणि १७ ते २१ जून दरम्यान विलंब शुल्कासह हा अर्ज भरता येणार आहे.

****

प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी, नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी, आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती, प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.

****

सामाजिक माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या व्हॉट्सॲपने देशातल्या ७४ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली. यापैकी २५ लाख खाती वापरकर्त्यांना फसवल्याच्या तक्रारीवरून बंद करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

्येष्ठ अभिनेते तसंच सहायक दिग्दर्शक गुफी पेंटल यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरबजीतसिंह पेंटल सं मूळ नाव असलेले गुफी पेंटल यांनी, १९७५ मध्ये रफुचक्कर या चित्रपटातून, सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनच्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामा ही त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सुलोचना यांचं परवा मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.

****

ओडिशात बालासोर रेल्वे अपघातातल्या बाधितांना मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशननं पुढाकार घेतला आहे. बाधितांच्या उपचारांना मदत आणि त्यांची जीवनशैली पुनरुज्जीवित करण्यास मदत करणार असल्याचं, रिलायन्सनं ट्विट संदेशात म्हटलं आहे. अदानी उद्योग समूहानेही या अपघाता अनाथ झालेल्या बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं काल मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राला शार्ट सर्किटने भीषण आग लागून मोठं नुकसान झालं, काल पहाटे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये ५० क्विंटल हरभरा, बारदान्याचे २१ गठ्ठे, फर्निचर, सीसीटीव्ही कॕमेरा, लॕपटॉइत्यादी सामानाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर पोलिसांनी काल कोपरगाव तालुक्यात एका कंटेनरमधून गुटखा, सुंगधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या जवळपास एकशे चौऱ्यांऐंशी गोण्या जप्त केल्या, या कारवाईत कंटेनरसह एकूण एक कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मध्यप्रदेशातल्या इंदूरहून येवलामार्गे अहमदनगर इथं हा गुटखा आणला जात होता, या प्रकरणी कंटेनर चालक अहमद इद्रीस याच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जर्मनीत सुहल इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांतनं दहा मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. मिश्र सांघिक प्रकारात भारतानं काल कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं जिंकून भारत पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात महालगाव इथं बस आणि कारच्या धडकेत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.

****

बीड जिल्ह्यात कार आणि दुचाकीच्या अपघातात पितापुत्राचा जागीच मृत्यू झाला. नेकनूर मांजरसुंभा मार्गावर काल दुपारी हा अपघात झाला.

****

हिंगोली जिल्ह्या वसमत मालेगाव मार्गावर एका अपघातात तेरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. दुचाकीला ट्रकने धडक दिल्यानं हा अपघात झाला. अजय बाळासाहेब लडके असं मृताचं नावं आहे.

****

उस्मानाबाद इथं काल पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ साठी अर्थसंकल्पातली तरतूद ४१५ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपये असून, मे-२०२३ अखेर पाच कोटी ९६ लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

दरम्यान, उस्मानाबाद इथं शासन आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ सावंत यांच्या हस्ते झाला. नागरिकांना कमी वेळेत एकाच छताखाली सर्व विभाग एकत्र आणून योजनांचा लाभ गतीमान पद्धतीने देण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या विभागांच्या स्टॉल्सवर भेट देऊन सावंत यांनी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

****

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं परभणी इथं उद्या बुधवारी आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्या विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर सहभाग नोंदवावा, सं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

कांद्याचे भाव सावरण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येवला इथं काल शेतकरी प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर, कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली, त्यानंतर मुंडन करत आंदोलन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कांदा उत्पादकांना संरक्षण द्यावं, निर्यातमूल्य कमी करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...