आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या
भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं
असून, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून
प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात
२८ जणांचा मृत्यू झाला असून, घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताबद्दल
दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान,
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपघातस्थळी जाऊन घटनेची माहिती घेणार आहेत.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, पंतप्रधान सहायता निधीमधून
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत १७ व्या सहकार काँग्रेसचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवसीय या कार्यक्रमाचं
आयोजन भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ - एन
सी यू आय ने केलं आहे. अमृतकाल
: सशक्त भारत के लिए सहाकारिता से खुशहाली,
अर्थात सहकारातून समृद्धी, हा या कार्यक्रमाचा विषय आहे.
***
वस्तू
आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीला आज सहा वर्ष पूर्ण झाली. या प्रणालीमुळे
देशाची अर्थव्यवस्था संघटीत करण्याबरोबर किमती कमी करणं आणि करार कक्षा वाढवण्यास
मदत झाली, असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती
आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट
संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं असून, शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
//*************//
No comments:
Post a Comment