आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आज वाराणसी इथल्या ज्ञानवापी
मशिदीचं सर्वेक्षण सुरु केलं आहे. वाराणसी इथल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार
कार्बनडेटिंग पद्धतीनं, शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्राचीन मंदिराच्या
अवशेषांवर ही मशीद बांधण्यात आली आहे का, हे या सर्वेक्षणातून तपासण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात यावी यासाठी मुस्लीम समुदायानं
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेचे माजी संघटन मंत्री, मदन दास देवी यांचं
आज पहाटे बंगळुरू इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. मदनदास देवी यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात
घालवलं. जवळपास ७० वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केलं. संघापासून ते भाजपपर्यंत
राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री
म्हणून काम करताना त्यांनी अनेक नेते घडवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
ट्विट संदेशाच्या माध्यमातून, मदन दास देवी यांना
श्रद्धांजली अर्पण केली.
****
मुंबई - पुणे राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर दोन ठिकाणी दरड
कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास आडोशी
बोगद्याजवळ मोठी दरड कोसळली, तर लोणावळा नजिक
पहाटे दुसरी दरड कोसळल्यानं, मुंबईकडे जाणारी
वाहतूक विस्कळीत झाली आहे. आडोशी बोगद्याजवळचे ढिगारे काढण्यात आले असून, वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात
सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
सातारा जिल्ह्यात कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातला पाणीसाठा ५० टक्क्याच्या वर पोहोचला आहे. धरणात सध्या
५८ हजार ८५१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. महाबळेश्वर इथं काल १८५
मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment