Friday, 1 September 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारानं 'एक देश एक निवडणूक' समिती स्थापन.

·      विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या चौदा सदस्यांच्या समन्वय समितीची घोषणा.

·      व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १५८ रुपयांनी कपात.

आणि

·      शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसह चारा छावण्या सुरू करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.

****

संपूर्ण देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारानं केंद्र सरकारनं 'एक देश एक निवडणूक' समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर लोकांकडून मतं मागवली जातील. संसदेतही यावर चर्चा होण्याची शक्यता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे लवकरच निश्चित होईल, त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक देश एक निवडणूक या संकल्पनेचं स्वागत करत, या बदलाची गरज व्यक्त केली. ते म्हणाले -

वन नेशन वन इलेक्शन ही अतिशय योग्य संकल्पना आहे. एका वेळी जर सर्व निवडणुका झाल्या तर देशाला त्याचा फायदा होईल. देशाच्या रिफॉर्मच्या अजेंड्याला त्याचा फायदा होईल. देशाच्या विकासामध्ये त्याचा एक मोठा वाटा असेल. आणि म्हणून आम्ही याचं स्वागत करतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं समर्थन केलं आहे. एकाचवेळी सर्व निवडणुका झाल्या तर उर्वरित वेळ विकासकांमाना गती देण्यासाठी वापरता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण झालं. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असून, देशाच्या सागरी इतिहासातला हा एक मैलाचा दगड असल्याचं, उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

भारताच्या सौरमोहिमेचा उपग्रह आदित्य एल वनच्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहाला पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर स्थापित केलं जाणार आहे. तिथपर्यंत पोहचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा काळ लागेल. या मोहिमेतून सूर्याचं वातावरण, पर्यावरण आणि संबंधित बाबींचा अभ्यास केला जाईल. सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरणार असल्याची माहिती बेंगलुरुच्या भारतीय अंतराळ भौतिकी संस्थेचे शास्त्रज्ञ बी.रविंद्र यांनी दिली आहे.

****

भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या दोन दिवसीय बैठकीला आज मुंबईत सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, विकासाच्या मुद्यावर महायुती एकत्र काम करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -

सत्तेचा मोह, खुर्चीचा मोह ना त्यांना आहे ना मला आहे. आम्हाला फक्त या राज्याचं भलं करायचं आहे. आणि आता अजितदादा आले आहेत. ते परखडपणे, स्पष्टपणे बोलणारे आहे. आमचा उद्देश एकच आहे. उद्देश या राज्याला पुढे नेणं. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, माताभगिनींच्या, विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे.

****

देशभरातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या चौदा सदस्यांच्या समन्वय समितीची घोषणा आज करण्यात आली. इंडिया आघाडीची दोन दिवसांची बैठक मुंबईत पार पडली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूक शक्यतो एकत्रितपणे लढवण्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विविध राज्यातल्या जागावाटपाबाबतचा विचार तातडीनं सुरू करण्यात येईल आणि याबाबतचा निर्णय लवकरात लवकर आणि सहकार्याच्या भावनेनं घेण्यात येईल, असं या ठरावात म्हटलं आहे. जनहिताच्या मुद्यांवरून देशाच्या विविध भागात मोर्चे काढण्यात येतील तसंच, जुडेगा भारत,जीतेगा इंडिया, हे या युतीचं घोषवाक्य असेल, असंही या ठरावात म्हटलं आहे.

****

स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचं स्मरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानात महाराष्ट्रातल्या जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावं, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे यांच्या हस्ते कुलाबा इथे एका कार्यक्रमात या अभियानाचा आज राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या अभियानात येत्या पंधरा तारखेपर्यंत राज्याच्या गावागावातून अमृत कलशांमधून थोडी माती आणि धान्य गोळा करून हे कलश येत्या एकतीस ऑक्टोबरला दिल्लीला अमृतवाटिका निर्माण करण्यासाठी नेले जाणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.

****

पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी इथं उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून होत असलेल्या वीजचोरीचा महावितरण विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असं या वीजचोराचे नाव असून त्याला दोन कोटी चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत पेट्रोलियम कंपन्यांनी १५८ रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी १ हजार ६४० रुपयांना मिळणारं १९ किलो वजनाचं सिलिंडर, आता मुंबईत १ हजार ४८२ रुपयांना मिळेल. औरंगाबादमध्ये या सिलिंडरची किंमत १ हजार ५८६ रुपये ५० पैसे इतकी असेल.

****

शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सुसंवाद हा कार्यक्रम लाभदायक असल्याचं मत या कार्यक्रमाचं समन्वयक डॉ किशोर झाडे यांनी व्यक्त केलं, ते आज औरंगाबाद इथं ९० व्या शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात बोलत होते. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्रात हा कार्यक्रम झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा कार्यक्रम केंद्राच्या वतीने घेतला जातो. पिकं, पशूपालन, फळ, भाजीपाला उत्पादन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर आज तज्ज्ञांनी या कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के अग्रीम अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, ही मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा, पशुधनासह जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनातून दिला आहे. या जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला असून, पावसाअभावी चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानं पशुधन संकटात आहे, या संकटातून सावरण्यासाठी सगळे निकष बाजूला ठेवून तातडीनं एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

मनमाड- धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं असून,यामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. या प्रश्नाची शासनस्तरावरून निश्चित दखल घेतली जाईल, असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिल्याचं भामरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...