Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 02 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.
पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल वन मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत, तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात काल पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत.
मराठा क्रांती मोर्चानं आज जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. जालना शहरातल्या अंबड चौफुली आणि चंदनझिरा पोलीस टी पॉईंट इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून, या आंदोलनास पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक सुरु केली असून, एका खाजगी ट्रकला जाळण्यात आलं आहे. पोलिस आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धाराच्या नळकांड्या फोडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात येत आहे. नागरीकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे. जनतेनं शांतता राखावी, असं त्यांनी सांगितलं आहे.
उस्मानाबाद इथं या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदच आवाहन करण्यात आलं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा तरुण एकत्र येऊन शहरवासीयांना दुचाकीवरून आवाहन करत असताना शहरातल्या नगरपालिका परिसरात काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. यानंतर संपूर्ण शहरात कडेकोट बंद असून, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा बंद केली आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे.
नवी मुंबईत वाशी इथं देखील आज मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शनं करण्यात आली. वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षाच्या वतीने एकत्र येऊन घोषणाबाजी करत लाठीहल्याचा निषेध केला.
सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात अनेक मार्गावरील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
****
राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निवेदन पाठवलं आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवायला लागली असून, पाऊस नसल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे तसंच शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असं भारती पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद इथं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातले अनेक तरुण या मेळाव्यात सहभागी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्किल इंडिया कार्यक्रमांतर्गत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांना भाडेतत्वावर देण्यात आलेल्या औरंगाबाद शहरातल्या सिद्धार्थ उद्यानाजवळच्या गाळ्यांचं कोविड काळातलं भाडं माफ करण्यात आलं आहे. याबाबत या दिव्यांगांनी केलेल्या विनंतीवर मनपा प्रशासक तथा आयुक्त जी.श्रीकांत यांनी निर्णय घेऊन हे भाडं माफ केल्याची माहिती उप आयुक्त अर्पणा थेटे यांनी दिली.
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आजपासून तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेत कँडी इथल्या पल्लेकेले क्रिकेट मैदानावर दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment