Thursday, 21 September 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.09.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक- नारी शक्ती वंदन विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू*

·      छत्रपती संभाजी नगर आणि लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रूग्णालयाचं व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर होणार- मंत्री हसन मुश्रीफ

·      धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठीचं उपोषण कायम

आणि

·      तीन दिवसांच्या महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींच्या उत्सवाला प्रारंभ*

****

महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक- नारी शक्ती वंदन विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरु आहे. केंद्रिय विधी आणि न्यायमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी १२८ वी घटना दूरुस्ती असलेलं हे विधेयक वरिष्ठ सभागृहात सादर केलं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना देखील सध्याच्या राखीव जागांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिलं जाईल परंतू यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं मेघवाल यावेळी म्हणाले. लोकसभेनंतर राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक एकमतानं संमत होईल असं भाजपंचे नेते जे.पी.नड्डा या संदर्भात वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

****

साखरेचे व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, त्यावर प्रक्रिया करणारे यांनी साप्ताहिक साखर साठा जाहीर करणं केंद्रानं बंधनकारक केलं आहे. साठेबाजार टाळण्यासाठी सरकार साखरेचा साठा आणि व्यवहारांवर बारीक नजर ठेवत आहे. हा पूर्णपणे डिजिटल उपक्रम असून याद्वारे साखर बाजार सुलभ होईल. याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारनं एका निवेदनाद्वारे दिला आहे. साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ होऊनही देशातले साखरेचे किरकोळ दर स्थिर आहेत. गरज भागवण्यासाठी साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहितीही सरकारतर्फे देण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजी नगर आणि लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रूग्णालयांचं व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर होणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मंत्रालयात छत्रपती संभाजी नगर, लातूर आणि नागपूर इथले अतिविशेषोपचार रूग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर चालवण्यासंदर्भातल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजी नगर आणि लातूर इथं दवाखान्यासाठी इमारत तयार आहे. याठिकाणी रूग्णांना उपचारासोबत अत्याधुनिक निदान सेवा मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. ही भागीदारी १५ वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार असल्याचही ते म्हणाले. दवाखान्याजवळच अत्याधुनिक निदान केंद्रांची सोय करावी. ज्याठिकाणी पॅथॉलॉजी नाहीत, तिथं लॅब सुरू करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

****

पुण्यातल्या लोणावळा परिसरातल्या निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी, निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातल्या लोणावळा आणि मावळ परिसरातल्या पर्यटन विकासाबाबत, पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाला धक्का न लावता पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य देत, या प्रकल्पाचा आराखडा महिन्याभरात तयार करावा, यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असं पवार म्हणाले. या परिसरात वाहनतळ तसंच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा समावेशही, या आराखड्यात करावा, अशी सूचना त्यांनी केली. यासोबतच मावळ तालुक्यातल्या कुसूर पठारावर, जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत देखील या बैठकीदरम्यान चर्चा झाली.

****

दुष्काळी संकट आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या मुद्द्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवर तीव्र टिका केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आणि राज्यातल्या पावसाची जिल्हानिहाय आकडेवारी, वडेट्टीवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून अहवालाद्वारे सादर केली. राज्यात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहेत, याची माहिती सरकारला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून मोकळं व्हायचं, हीच महायुती सरकारची पद्धत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे.

****

राज्यातल्या काही भागात जोरदार पाऊस होत आहे. बीड जिल्ह्यात आज सकाळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दुपारच्या सुमारास बीड तालुक्यातल्या पाली, मांजरसुंबा, कपिलधार, कोल्हारवाडी कर्जनीसह इतर गावांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. तसंच  आनंदवाडी, जिरेवाडी, बहिरवाडी, एमआयडीसी, रामतीर्थ नगर, बीड शहरामध्ये दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मालेगांव, रिसोडसह बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. आज सकाळपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणीही पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे.

****

धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत धनगर आरक्षण बैठक घेण्यात आली. राज्य सरकार यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यानं, आंदोलकांनी उपोषणावर ठाम राहणार असल्याचं म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं धनगर समाज कार्यकर्त्यांचं सोळा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राज्यसरकार तोडगा काढत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारनं ज्याप्रमाणे अनुसुचित जमातीचं आरक्षण वाढवलं, तसंच महाराष्ट्र सरकारनंही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

****

आज दुपारच्या सुमारास अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचं घरोघरी आगमन झालं. गौरींच्या स्वागतानंतर आता उद्याच्या ज्येष्ठा गौरी पूजनाची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. गौरी पूजनासाठी निरनिराळी फळं, भाज्या, तसंच हार फुलं घेण्यासाठी बाजारपेठांमधून नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. उद्या पूजनानंतर परवा गौरींचं विसर्जन होणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथल्या मोसंबी संशोधन केंद्रात लागवड करण्यात आलेल्या मोसंबी आणि लिंबूवर्गीय वाणांचा संग्रह भविष्यात शेतकरी आणि एकूणच देशसाठी हिताचा ठरेल, असं प्रतिपादन राष्ट्रीय पादप अनुवंशिक संसाधन संस्थेच्या, लिंबूवर्गीय प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र मलिक यांनी केलं आहे. त्यांनी आज बदनापूर इथल्या मोसंबी संशोधन केंद्रास भेट दिली, त्यावेळी मलिक बोलत होते. या केंद्राच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या विविध वाण आणि खुंटांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी काही फळांची निवड करुन त्याची संशोधन संस्थेत साठवणूक केली जाईल. भविष्यात हा साठा शेतकरी तसंच या पिकावर संशोधन करणाऱ्या संशोधकांना कामी येईल, असं केंद्रप्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

जळगांव जिल्हयातल्या चाळीसगाव तालुक्याच्या ब्राह्मणशेवगे गावातले संशोधक प्रकाश सुनील पवार यांच्या संशोधनाला पेटंट मिळालं आहे. या कार्यासाठी त्यांना २० वर्षांसाठी बौध्दिक संपदा अधिकारही प्राप्त झाले आहेत. पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरू शकतील, या त्यांच्या संशोधनाचा शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून बीड जिल्ह्यातल्या शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वडवणी इथं `पीएम स्कील रन` ही पाच किलोमीटर मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचं उद्घाटन वडवणी इथले पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित 'गाथा मुक्ती संग्रामाची',हे नाटक बीडमध्ये सादर केलं जाणार आहे. वडवणी येथील चौंडेश्वरी माता मंगल कार्यालयामध्ये उद्या सायंकाळी सात वाजता नाटकाचा प्रयोग होईल. सतीश साळुंके यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं असून परळी, अंबाजोगाई आणि केज या भागात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर, बीडमध्येही या नाटकाचा प्रयोग होत आहे.

****

नवी मुंबईत कामोठे इथं मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत भजनी मंडळ आणि ढोल ताशांच्या गजरात आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या यात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी माती तसंच धान्य संकलित केलं. काल कळंबोली इथं ही यात्रा काढण्यात आली होती, उद्या पनवेल इथं अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे.

****

लातुर जिल्ह्यात सेवा महिना अंतर्गत औसा इथं आज पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यासाठी विविध संस्थातर्फे २४७ पदांसाठी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी सांगितलं. या पदांसाठी दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी तसंच इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यक असून इच्छूकांनी २७ सप्टेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे असं आवाहन मरे यांनी केलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नीट, जेईई, एमएचटी-सीईटी या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना टॅब आणि सिमकार्डचं नुकतंच वितरण करण्यात आलं. २०२३-२४ या वर्षात शिक्षण घेणाऱ्या आणि ऑनलाईन अर्ज केलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गातील पात्र विद्यार्थ्याना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे प्राप्त झालेले हे टॅब सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी मिनगिरे यांनी  विद्यार्थ्यांना टॅबच्या उपयोगाविषयी मार्गदर्शन केलं. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसंच काम करण्याची जिद्द निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...