Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक
कायदेशीर चौकट तयार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.
· नागपूर शहरात अतिवृष्टीचे दोन बळी-मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा.
· ठाणे जिह्यात उल्हासनगर इथं सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट;तिघांचा मृत्यू.
आणि
· बीड इथल्या यश जाधवची १८ वर्षाखालील भारतीय रग्बी संघात
निवड.
****
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक
कायदेशीर चौकट तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी
दिल्ली इथं आज सकाळी दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सायबर
दहशतवाद, आर्थिक गैरव्यवहार, कृत्रिम
बुद्धिमत्तेचा गैरवापर या समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक चौकटीची गरज आहे,
हे एकट्या दुकट्या सरकारचं काम नसून, विविध
देशांच्या कायदेतज्ज्ञांनी यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी नमूद केली.
****
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत
असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट
संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज झाली, त्यावेळी बोलत
होते. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून इतर देशांशी संबंध वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. क्रीडा क्षेत्रात भारतात विपुल गुणवत्ता असून,
त्याला वाव देण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. क्रीडासंकुल उभारलं की आसपासच्या परिसराचा आर्थिक
विकास वेगाने होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी क्रिकेटपटू
सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन
तेंडुलकर, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित
होते.
****
नागपूर आणि परिसरात मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या
पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार तासांत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अंबाझरी तलाव ओसंडून
वाहत आहे. दरम्यान, या पुरामुळे दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १४ जनावरंही दगावली आहेत. जिल्हा आणि महानगर
प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत असून, शहरासह
जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. सैन्य दलाच्या दोन
तुकड्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरु असून, चारशे नागरिकांना
सुरक्षितस्थिळी हलवण्यात आलं आहे. नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाराची व्यवस्थाही करण्यात
आली आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमरावती
जिल्ह्यातही गेल्या ४८ तासापासून होत असलेल्या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत
आहेत. दरम्यान, दर्यापूर तालुक्यात आज एक युवक नदीपात्रात
वाहून गेल्याचं वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसंच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा
आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना
आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धोकादायक घरं आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तत्काळ हलवण्याच्या
सूचना देत, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही
मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ,
एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री
शिंदे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान नागपूर परिसरात पुढचा आठवडाभर जोरदार
पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
****
ठाणे जिह्यातल्या उल्हासनगर शहाड गावठाण
इथल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत आज दुपारी स्फोट झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे
तर १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात
येत आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाच्या
आवाजाने संपूर्ण परिसर हादरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या स्फोटाचं कारण अद्याप समजलं नसून, कंपनी समोर कामगारांच्या
नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या
सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थिनींवर चिखली इथल्या खाजगी
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसतीगृहात सतत नित्कृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा
आरोप या विद्यार्थिनींनी केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला
आहे. आमदार श्वेता महाले, माजी आमदार रेखा खेडेकर यांच्यासह
चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार सखाराम पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विषबाधा
झालेल्या मुलींच्या प्रकृतीची चौकशी केली.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विकसित केलेल्या एम. ए. इतिहास या
शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली
आहे. या शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाने १७५ अभ्यासकेंद्रं सुरु केली आहेत.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमाच्या
प्रवेशास पात्र आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ ही आहे, असं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित
होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा १०५
वा भाग असून, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून उद्या
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. आकाशवाणीचं संकेतस्थळ
तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आज एक दिवसीय दौऱ्यासाठी
मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर शाह यांचं
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत
पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित
होते. शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी स्थापन श्रीगणेशाचं दर्शन घेतलं.
भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणेश
मंडळालाही शहा यांनी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यानी लालबाग इथं जाऊन
लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात ‘मेरी माटी, मेरा देश’
या अभियानाचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे. या
अंतर्गत प्रत्येक गावात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जात असून, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५ हजार
कुटुंबांकडून माती, तांदुळाचं संकलन
करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय
सेवा योजना विभागाच्या वतीने आज 'मेरी माटी मेरा देश"
अभियानांतर्गत अमृतकलशात माती संकलन करण्यात आलं. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांच्या उपस्थितीत झालेल्या
या कार्यक्रमात कुलसचिव, डॉ.भगवान साखळे,
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, संचालक
डॉ मुस्तजीब खान, रासेयो संचालक डॉ सोनाली क्षीरसागर यांच्यासह
विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
बीड जिल्ह्यातल्या यश बालासाहेब जाधव या
रग्बी खेळाडूची १८ वर्षाखालील भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे. आशियायी रग्बी
स्पर्धा तैवानच्या तैपेयी इथं येत्या ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खेळल्या
जाणार आहेत. बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात गेल्या ४
वर्षापासून या खेळाचा प्रचार, प्रसार
करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरीय
स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य पदके
प्राप्त केली आहेत.
दरम्यान, बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. योगेश क्षीरसागर यांची
सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड बीडवासियांसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या इंदूर इथं खेळवला
जाणार आहे. उद्या दुपारी दीड वाजता सामन्याला प्रारंभ होईल.
तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर
आहे.
****
लातूर जिल्ह्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या ९२५ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९३ रुग्ण लातूर शहरातले तर ५३३ रुग्ण शहराबाहेरचे असल्याची माहिती,
महापालिकेकडून मिळालेल्या अहवालात देण्यात आली आहे. महापालिकेकडून धूरफवारणी तसंच ॲबेटिंगची कार्यवाही करण्यात येत असून,
नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन महापालिकेकडून
करण्यात येत आहे.
****
नदिष्ट कांदबरीचे लेखक मनोज बोरगांवकर यांचा उद्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या
वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या
सभागृहात उद्या सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा केला
जातो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं स्वच्छता पंधरवडा
अभियान हाती घेतलं आहे.
****
No comments:
Post a Comment