Saturday, 23 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.09.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 23 September 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ सप्टेंबर  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      नारी शक्ती वंदन अधिनियम ही नव्या लोकशाही बांधिलकीची घोषणा-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      दुष्काळी परिस्थितीत जलाशयांच्या कोरड्या पडणाऱ्या जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

·      शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

·      आणि

·      पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय

सविस्तर बातम्या

 नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण विधेयक हा कोणताही सामान्य कायदा नसून, नव्या भारताच्या, नव्या लोकशाही बांधिलकीची घोषणा असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात नारी शक्ती वंदन-अभिनंदन कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. हे ऐतिहासिक विधेयक पूर्ण उत्साहात मंजूर केल्याबद्दल त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, सर्व राजकीय पक्षांचे आणि खासदारांचे आभार मानले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १०५ वा भाग असेल.

****

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करून ते सातशे कोटी रुपयांवरून एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत पवार यांनी, महामंडळाची कर्ज हमी पाचशे कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असंही सांगितलं. महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी, या महामंडळालाही लागू करणं, आणि पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

****

दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालच्या आणि तलावाखालच्या कोरड्या पडणाऱ्या जमिनीवर, फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास तसंच मत्स्यव्यवसाय विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यासंदर्भात लाभार्थी निवड, समन्वय आणि सनियंत्रणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. लाभार्थींना बियाणे वाटप योजनेअंतर्गत मका तसंच ज्वारी या वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील, असं या निर्णयात म्हटलं आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या पच्छिम किनारपट्टी भागात काल संध्याकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक आठ दशांश इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात दहा किलोमीटर खोलवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

****


अहमदनगर इथं केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह तसंच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त मल्टिमिडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात पौष्टीक तृणधान्यं, त्यापासून बनवण्यात आलेले पदार्थ, त्यांचं आहारातलं महत्त्व याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून एलईडी टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे.

****

नवी मुंबईत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने काल अंगणवाड्यांमध्ये पालक सभा घेण्यात आली. मुलांसाठी कोणता आहार योग्य आहे, याबाबत यावेळी माहिती देण्यात आली, तसंच आहाराच्या योग्य सवयी, वैयक्तिक तसंच परिसर स्वच्छता, आणि पाणी बचत याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

****

शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसान भरपाईसह हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषीमंत्र्याच्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, कोणत्याही विषयावर सरकार गंभीर नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही दुष्काळ जाहीर करावा, असं ते म्हणाले.

दरम्यान, आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे वडेट्टीवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महासचिव सुशिला मोराळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्यासोबत त्यांनी या निवेदनातल्या विविध विषयांवर चर्चा केली.

****

बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. जिल्हाभरात पावसाच्या अनियमिततेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याने, सर्व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आर्थिक मदत करणं आवश्यक असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.

****

ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल घरोघरी साजरा झाला. परवा विराजमान झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची मनोभावे पूजा करून, त्यांना आणि त्यांच्या बाळांना षड्‌रस भोजनासह फराळाच्या विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. आज गौरींचं विसर्जन होणार आहे.

****

धाराशिव शहरात एकता फाऊंडेशन गणेशोत्सव मंडळांने यंदा रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलपुनर्भरण करणारा देखावा तयार केला आहे. नागरिकांनी जलपुनर्भरणाला प्राधान्य द्यावं हा संदेश या देखाव्यातून मंडळाने दिल्याचं, मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...

Byte…

आपण पाहत आहोत की, गेल्या काही महिन्यापासून पाऊस काळ हा अत्यंत कमी पडलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याची बचत ही कशी होईल व प्रत्येक पाण्याच्या थेंबाचं संकलन कशा प्रकारे होईल यासाठी आम्ही रेन हार्वेस्टींग या देखाव्याद्वारे सर्व जनतेला आवाहन करत आहोत की, आपण रेन हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट आपल्या प्रत्येक घरावर राबवावेत, प्रत्येक पाण्याचा थेंब हा आपण वाचवावा.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या जर जरी जर बक्ष या ऊर्सला सुरुवात होत आहे. यंदा ऊर्सचं ७३७ वं वर्ष आहे. आज संदल मिरवणुकीने प्रारंभ होणाऱ्या या ऊर्सची सांगता ईद -ए -मिलाद -उन्नबीच्या दिवशी होईल. त्या दिवशी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा केस आणि पोषाख दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल मोहाली इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाच गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात दहा बाद २७६ धावा केल्या. भारताच्या संघानं हे लक्ष्य पाच गडी गमावत ४९ व्या षटकात पूर्ण केलं. शुभमन गीलने ७४, ॠतुराज गायकवाडने ७१ धावा केल्या. पाच बळी घेणारा मोहम्मद शमी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या होंगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत साथियान ज्ञानसेकरन, अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांच्या भारतीय पुरुष टेबल टेनिस संघानं काल येमेनचा तीन - शून्यने सहज पराभव केला. भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने सिंगापूरचा पराभव करुन विजयी सलामी दिली. आज भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे.

****

बनावट कागदपत्रं आणि बनावट नंबरप्लेटच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या भामट्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथून अटक करण्यात आली. इब्राहिम अमीन पटेल असं त्याचं नाव असून, तो बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातला रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून परराज्यातून चोरलेली एक कोटी बारा लाख रुपये किमतीची १२ वाहनं जप्त करण्यात आली, यामध्ये चारचाकी गाड्यांसह महागड्या दुचाक्यांचा समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं एका गणेश मंडळात विद्युत माळेतून विजेचा धक्का लागल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शिवतेज सोंडगे असं या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी मंडप मालक सुभान फकीर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नांदेड इथं पोलिसांनी एका पाणीपुरी विक्रेत्याकडून दोन गावठी पिस्तुलं आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. गणेश उत्सवादरम्यान गस्त घालत असताना नवा मोंढा परिसरात ही कारवाई करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या वाकोडी शिवारात देखील गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून एक तरुणाकडून गावठी पिस्तुल आणि तलवार जप्त केली.

****

हिंगोली इथं सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळून या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला.

****

अहमदनगर- बीड- परळी रेल्वे मार्गासाठीच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या विद्युत तारेची चोरी झाली आहे. याप्रकरणी अहमदनगर इथं रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

 

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने काल तीन टप्प्यांमध्ये विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून सहा हजार ७५२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस विभागाच्या वाहतूक शाखेच्या वतीने प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनचालक आणि मालक यांच्यासाठी काल मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १७८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...