Friday, 23 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      वीजेवरची वाहनं चार्ज करण्यासाठी ग्राहकांना स्वतंत्र वीज जोडणी घेता येणार

·      लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

आणि

·      केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते लातूर तसंच धाराशिव इथं विकासकामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन

****

वीजेवरची वाहनं चार्ज करण्यासाठी ग्राहकांना स्वतंत्र वीज जोडणी घेता येणार आहे. अशी वीज जोडणी मिळण्यासाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. महानगरांमध्ये आता सात ऐवजी तीन दिवसांत, नगरपालिका क्षेत्रात पंधरा दिवसांऐवजी सात दिवसांत तर ग्रामीण भागात एका महिन्याऐवजी पंधरा दिवसांत नवी वीज जोडणी मिळू शकणार आहे.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे आणि नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे. दरम्यान, फडणवीस यांनी अश्वमेघ यज्ञ निमित्त मुंबई इथं आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचीही सदिच्छा भेट घेतली.

****

माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसंच अनेक आमदार आणि खासदारांनी जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तीक्ष्ण बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यामुळे सगळ्या पक्षांतल्या नेत्यांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळालं, अशा राष्ट्रपतींनी शब्दांत जोशी यांच्या कार्याला उजाळा दिला.

शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी लक्षणीय कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून नेलं, ‌असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनोहर जोशी यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

****

वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्याच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी वाशिम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९९७ ते २००३ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. २००४, २०१४ आणि २०१९ मधे कारंजा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. पाटणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाटणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रात पुणे इथं होणाऱ्या पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोला भेट द्यावी, असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. पुणे इथल्या मोशी इथं उद्या २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात येत असेलल्या या डिफेंन्स एक्स्पो मध्ये सामंत यांनी शस्त्रास्त्रांची पाहणी करून माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते. देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसंच, खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असं सामंत म्हणाले.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॉंग्रेसने आज राज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली. मुंबई इथं झालेल्या या कार्यक्रमात कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत लखपती दिदी कामाबाबात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, लिड बँकेचे मंगेश केदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मास्टर ट्रेनर सीआपीएस आणि संभाव्य लखपती दिदीची ओळख आणि त्याचं प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

****

दिव्यांगांच्या अडीअडचणी आणि विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी पवार बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपण असलं पाहिजे त्यामुळे मुलांना शालेय वातावरण मिळतं, असं पवार म्हणाले.

दरम्यान, गंगापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज झालं, अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंह राजे होळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज लातूर तसंच धाराशिव दौऱ्यावर आहेत. अहमदपूर इथल्या भक्तिस्थळावर झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते आज विविध विकासकामांसह सहा राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. काश्मीर ते कन्याकुमारी या ५० हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. धाराशिव इथल्या १२९ कोटी ९ लाख रुपयांच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजनही गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान, उदगीर वळण रस्त्यासाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद करणार असून औसा वळणरस्ता करण्याची घोषणाही गडकरी यांनी केली. मंत्री संजय बनसोडे, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, प्रताप पाटील चिखलीकर, संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रांची इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात ७ बाद तीनशे २ धावा केल्या आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून आकाशदीपने ३, मोहम्मद सिराजने २ तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक- एक गडी बाद केला.

****

नांदेड जिल्हा परिषदेत आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा पाणी आणि स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****

बुलडाणा इथं महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज 'जागर लोक कलेचा' कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव लावणी या लोक कला सादर करण्यात आल्या तसच हास्यकवी संमेलन घेण्यात आलं. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

****

नांदेड इथं राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या जलरथाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. हा रथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये जलरथाच्या माध्यमातून जल जीवन मिशन, स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण तसच गाळमुक्‍त धरण-गाळयुक्‍त शिवार आणि जलयुक्‍त शिवार आदी विषयाचे चित्र आणि हस्त पत्रिकेच्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेचे स्‍वयंसेवक गावा-गावात जनजागृती करणार आहेत.

****

No comments: