Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ;आज अंतरिम अर्थसंकल्प
· नांदेड विभागातल्या चार स्थानकांसह देशभरातल्या दोन हजारांहून अधिक रेल्वे प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
· प्रसिध्द गजल गायक पंकज उधास यांचं कर्करोगाने निधन
· मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
· जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस;दोघांचा मृत्यू
आणि
· रांची कसोटीत भारताचा इंग्लंडवर पाच गडी राखून विजय;मालिकेत अजेय आघाडी
सविस्तर बातम्या
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात मांडल्या. यात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईकरता, एक हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद असून, कृषीपंप-यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला वीज देयकाच्या अनुदानासाठी, एक हजार ३७५ कोटी रुपयांहून अधिक तरतूद प्रस्तावित आहे. दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार आहे.
****
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय देण्याची मागणी काल विधानसभेत केली. अजित पवार यांनी यावर उत्तर देताना, सरकार याप्रकरणी सकारात्मक आहे, मात्र आंदोलकांनी थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग निघेल, असं आश्वासन दिलं.
दरम्यान, गेल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषेदत जाहीर केलं.
****
सुरत ते चेन्नई आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन नवीन प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्रासाठी लाईफ लाईन ठरणार असल्याचं, केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं काल राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत नवीन रस्ता बांधणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे हे अंतर केवळ दोन तासात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
देशातल्या दोन हजारांहून अधिक रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, या प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. अमृत भारत स्थानक प्रकल्पांतर्गत त्यांनी देशातल्या ५५३ रेल्वेस्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामाची पायाभरणी केली. या स्थानकांमध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या हिमायतनगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगावसह, राज्यातल्या ५६ स्थानकांचा समावेश आहे. नांदेड इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अशोक चव्हाण, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
दरम्यान, पंतप्रधान उद्या यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता, तसंच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यांचं, एकत्रित वितरण होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुमारे ८८ लाख शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे.
****
केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर, ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर तसंच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रांवर, पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार असून, ‘पीएम किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या लाभ वितरण समारंभात लिंकद्वारे शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
प्रसिध्द गजल गायक पंकज उधास यांचं काल निधन झालं, ते ७२ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगानं आजारी होते. काल मुंबईत ब्रिच कँन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. १७ मे १९५१ रोजी जन्मलेल्या पंकज उधास यांनी गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. नाम चित्रपटातल्या चिठ्ठी आयी है या गीताने पंकज उधास प्रकाश झोतात आले. २००६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उधास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे कलमासाठी मागील १६ दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. काल दुपारी आंतरवाली सराटी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत, त्यांनी हा निर्णय जाहीर करत, काही भगिनींच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं. अंबड तालुक्यातले जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा, तसंच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध, या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी तूर्तास हे उपोषण मागे घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशाचं संविधान कोणत्याही परिस्थितीत बदललं जाणार नाही, असा विश्वास देशातल्या दलित बांधवांना आपण देत असल्याचं, भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
लातूर इथंही आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली, मराठा आरक्षणाचं मोठं श्रेय हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जातं, मात्र कायद्यापेक्षा कुणीही मोठं नसल्यामुळे जरांगे यांनी सांभाळून विधानं करावीत, असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप लवकरच होणार असून, यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोलापूर आणि शिर्डीची जागा सोडण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिवस आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होत आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात, प्रा. वा. ल. कुळकर्णी व्याख्यानमालेत, 'मराठी भाषा-काल, आज आणि उद्या', या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचं व्याख्यान झालं. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे आज कवितादिनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या गोरठा इथं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चौथं मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जाफ्राबाद तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये जवळपास २० मिनिटं बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू, हरभरा, कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. जाफ्राबाद तालुक्यातल्या कुंभारी इथल्या पल्लवी दाभाडे या महिला शेतकऱ्यासह सिपोरा बाजार इथले शेतकरी शिवाजी कड यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातही काल अवकाळी पावसासह गारपीट झाली. जळगाव तसंच बुलडाणा जिल्ह्यातही काल गारपीट झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
रांची इथं झालेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं काल चौथ्या दिवशी, इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. याबरोबरच भारतानं पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक ५५ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल ३७ धावा काढून बाद झाला. शुभमन गिलनं नाबाद ५२ तर ध्रुव जुरेलनं नाबाद ३९ धावा केल्या. ध्रुव जुरेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला पुढचा आणि अखेरचा सामना सात मार्चपासून हिमाचल प्रदेशात धरमशाला इथं होणार आहे.
****
नांदेड इथं संगीत शंकर दरबार संगीत संमेलनाला कालपासून प्रारंभ झाला. ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे - देशपांडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गायक पंडित श्याम गुंजकर यांना २०२४ चा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ, मानपत्र आणि २१ हजार रुपये असं या पुरस्काराच स्वरूप आहे.
दरम्यान, देशाचे माजी गृहमंत्री तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना नांदेड इथं अभिवादन करण्यात आलं. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
मराठा आरक्षण हा सध्या राज्यातला ज्वलंत विषय असून, शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांनाही न्याय मिळेल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने लवकर तोडगा काढल्यास, ओबीसींना देखील आपल्या ताटातले काहीही जात नाही याची खात्री पटेल, असं आंबेडकर म्हणाले.
****
पणन कायद्यातल्या बदलाविरोधात राज्यातल्या बाजार समित्यांनी विरोध दर्शवत काल राज्यस्तरीय बंद पुकारला होता. यात हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह, उपबाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. परिणामी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी इथं जलरथ अभियानाला काल प्रारंभ झाला. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या जलरथाचं उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं.
****
No comments:
Post a Comment