Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर;सुमारे
पाच हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसंच शिक्के
प्रकरणी गुन्हा दाखल
· संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर;लातूरचे
नागेश आडगावकर यांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कार
आणि
· म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज
नोंदणीला प्रारंभ
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर
आले आहेत. आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास नागपूरच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन झालं. केंद्रीय रस्ते वाहतुक
आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह प्रशासनाच्या वतीनं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर वायुसेनेच्या
हेलिकॉप्टरने पंतप्रधान यवतमाळ इथं दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांनी त्यांचं कार्यक्रम स्थळी स्वागत केलं.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या चार हजार
नऊशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचन संबंधित विविध
पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
यामध्ये वर्धा-कळंब रेल्वे मार्ग आणि आष्टी-अमळनेर रेल्वे मार्ग, यांचा
यात समावेश आहे. या मार्गांवरच्या दोन रेल्वे गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.
राज्यातल्या सुमारे साडेपाच लाख महिला बचत
गटांना आठशे पंचवीस कोटी रुपये फिरता निधी वितरण आणि
एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणासह, ओबीसी प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी मोदी
आवास घरकुल योजनेचा शुभारंभही पंतप्रधान करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
योजनेचा सोळावा हप्ता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता
पंतप्रधान आज जारी करतील.
****
राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त पंतप्रधानांनी
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलं सरकार तरुणांना
संशोधनाकडे जायला प्रोत्साहन देत आहे, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधन आणि तंत्रज्ञान यावरचे
आपले विचार सांगणारी एक चित्रफीतही त्यांनी सामायिक केली आहे. 'विकसित
भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना
आहे.
****
"मुंबईच्या पाण्याची" एक श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी मुंबई भाजपाध्यक्ष
आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये महायुती सरकारनं केलेली कामं आणि गतिमान विकास याबाबत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचा आभार मानणारा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेला सुरूवात
करताना शेलार यांनी ही मागणी केली. मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही
मुंबईकरांना पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची
सत्त्यता समोर येण्यासाठी ही श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शेलार यांनी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी
तसंच शिक्के घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात
आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदनं आणि पत्रं पुढील कार्यवाहीसाठी
ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद
होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात, नुकत्याच
मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट
स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं लक्षात आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
****
विधानसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी,
राज्यात परवा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित
केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल मागवला असून, तातडीने
मदत दिली जाईल,
असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, शेतपिकांना योग्य भाव
द्या, अशी मागणी करत सरकारने हमीभाव कमी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी
टीका करत विरोधी पक्षातल्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन केलं.
****
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक
उत्तरदायित्व निधी मधून अंगणवाडी तसच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण
उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. मुंबईतील
कुर्ला पाइपलाईन भागातील अंगणवाडीतील मुलांना आज या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं. एसबीआय कॅप्स मार्केटकडून उपलब्ध सीएसआर निधीतून
ठाणे आणि पालघर इथं तीन हजार ३० विद्यार्थ्यांना तर ऑन लॅबोरेटरिज लिमिटेड यांच्याकडील
सी एस आर मधून अंगणवाड्यांमधील चार हजार ६०० मुलांना ह्या डेस्कबॅगचे वाटप करण्यात
येणार आहे.
****
संगीत नाटक अकादमीचे गेल्या दोन वर्षांसाठीचे
पुरस्कार जाहीर झाले आहेत. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू
राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न विद्यावेतन जाहीर करण्यात आलं
आहे. तीन लाख रुपये,
मानवस्त्र आणि ताम्रपत्र असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
याशिवाय गायनासाठी कलापिनी कोमकली तसंच देवकी
पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ,
सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक
विजय चव्हाण
यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख
रुपये, मानवस्त्र आणि ताम्रपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कारही
जाहीर करण्यात आले. अभिनयासाठी ऋतुजा बागवे, सुगम संगीतासाठी नंदिनी गुजर, शास्त्रीय
गायनासाठी अनुजा झोकरकर,
लोकनृत्यासाठी प्रमिला सूर्यवंशी, सरोद
वादनासाठी सारंग कुळकर्णी,
पारंपरिक नाट्यकलेसाठी प्रियंका ठाकूर तर अभंग गायनासाठी लातूरचे
नागेश आडगावकर यांच्यासह ८० तरुण कलावंतांना या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. २५ हजार
रुपये, मानवस्त्र आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
म्हाडाचा छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि
क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी
आणि धाराशिव इथल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९४१ सदनिका आणि ३६१ भूखंडांच्या
विक्रीकरता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा
"गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ आज म्हाडा विभागीय कार्यालयात झाला. याबरोबरच
नूतन संगणकीय प्रणाली आणि ऍपच्या साहाय्यानं सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज
दुपारी बारा वाजेपासून सुरवात झाली आहे. ही नोंदणी २७ मार्च २०२४ च्या मध्यरात्री १२
वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. १२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी तीन वाजता अंतिम पात्र अर्जाची
यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर सोडतीचं स्थळ आणि दिनांक पात्र अर्जदारांना कळवण्यात
येणार आहे.
****
निवडणुकांमधे युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी
केंद्र सरकार आजपासून देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधे मेरा पहला वोट देश के लिए
हा कार्यक्रम आयोजित करत आहे. राष्ट्राच्या व्यापक हितासाठी मतदानाचं महत्त्व बिंबवणं
आणि तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं, हा कार्यक्रमामागचा उद्देश
आहे. येत्या ६ मार्चपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील.
****
परभणी इथं आज युवा कार्यक्रम आणि क्रीडा
मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीनं कमलताई जामकर महिला महाविद्यालय़ात
मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वागत गीतानं या कार्यक्रमाची
सुरुवात झाल्यानंतर शाहीर उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार जनजागृती गीत सादर
केलं. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ता गिणगिणे यांनी विद्यार्थ्यांना मतदान
प्रणालीचं मार्गदर्शन केलं. तर इतर कर्मच्याऱ्यांनी ऑनलाईन मतदार नोंदणी कशी करावी
याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं.
****
भटक्या जाती-जमातीमधील घटकांना त्यांच्या पालावर जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव
उपक्रम आज लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आला. प्रशासनाने आपल्या दारात
येवून शासकीय योजनांचा लाभ दिल्याने बुऱ्हानगर इथल्या पालावरील भटक्या विमुक्तांच्या
चेहऱ्यावर समाधान झळकलं. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जवळपास ९० व्यक्तींना
विविध लाभांचं वितरण करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी पालावरील कुटुंबांशी प्रामुख्याने
महिला आणि मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
****
No comments:
Post a Comment