Tuesday, 27 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राज्याचा नऊ हजार ७३४ कोटी रुपये महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर

·      राज्यात आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचा विरोधकांचा आरोप

आणि

·      पंतप्रधान उद्या यवतमाळ दौऱ्यावर-सुमारे पाच हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन तसंच लोकार्पण

****

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचं लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आलं आहे. महसुली जमा आणि तुटीबाबत बोलताना अर्थमंत्री पवार म्हणाले -

२४-२५ मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे. महसुली जमा चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन कोटी रूपये, महसुली खर्च पाच लाख आठ हजार चारशे ब्याण्णव कोटी रूपये प्रस्तावित आहे. परिणामी नऊ हजार सातशे चौतीस कोटी रूपयाचा महसुलीचा तूट अपेक्षित आहे. राज्यातील सन २०२४-२५ ची राजकोषीय तूट नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रूपये आहे.

 

सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपये खर्चाच्या या अर्थसंकल्पातून राज्यातली गुंतवणूक वाढवण्यावर भर दिल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. निर्यात वाढीसाठी राज्यात पाच इंडस्ट्रिअल पार्क्स ची निर्मिती करणार असून, मेक इन इंडिया अभियानासाठी १९६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

जुन्नर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १४५ शहरांतले ३१२ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबवण्यात येणार आहे.

सात हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचं राज्याचं लक्ष्य असून ऊर्जा विभागासाठी अकरा हजार नऊशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद केल्याचं पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करून त्यातून साडेआठ लाख नवे सौर कृषी पंप बसवण्यात येणार असून, सगळ्या उपसा सिंचन योजनांचं येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपये तर जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिवसह नव्या तीन रेल्वे मार्गांचं भूसंपादन सुरू करण्यात येणार असून, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर यासह चार नवीन रेल्वे मार्गांकरता तसंच जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आदी रेल्वे मार्गांकरता ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यात येणार आहे.

या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन विभागासाठी एक हजार चारशे बत्तीस कोटी, उद्योग विभागासाठी एक हजार एकवीस कोटी, महिला आणि बाल कल्याण विभागासाठी तीन हजार एकशे सात कोटी, राज्यातल्या रेल्वेमार्ग प्रकल्पांसाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी, सहकार विभागासाठी एक हजार नऊशे बावन्न कोटी, तसंच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी तीन हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांची तरतूद आहे. ग्रामविकास विभागासाठी नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी, मदत आणि पुनर्वसन प्रकल्पांसाठी सहाशे अडुसष्ट कोटी, दिव्यांग कल्याण विभागासाठी एक हजार पाचशे सव्वीस कोटी, गृहनिर्माण विभागासाठी एक हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची तरतूदही या अर्थसंकल्पात आहे.

क्रीडा विभागासाठी पाचशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करतानाच, राज्यातल्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत घसघशीत वाढ केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला एक कोटी, रौप्य पदकासाठी पंचाहत्तर लाख आणि कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. रामजन्मभूमी अयोध्येत तसंच काश्मीरमध्ये श्रीनगर इथे महाराष्ट्र सदन उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

"एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २८" जाहीर करण्यात आलं असून, त्यात अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबाला एका साडीचं मोफत वाटप करण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ५ हजार ७०० गावांमधल्या १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

जालना आणि हिंगोलीसह राज्यात अकरा ठिकाणी प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्नित ४३० खाटांची रुग्णालयं उभारण्यात येणार असून, लातूरसह सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची परिचर्या महाविद्यालयं सुरू करण्याचं या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. नागपूर एम्सच्या धर्तीवर पुण्यात औंध इथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येणार आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यात लोणार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ, अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा तसंच कळसूबाई, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र माहूरगड आणि पुणे जिल्ह्यात एकवीरादेवी मंदिर इथे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना होणार आहे.

 

आजच्या राजभाषा दिनाचं औचित्य साधून पवार यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेतल्या या ओळींनी अर्थसंकल्पीय भाषणाचा समारोप केला -

आज ज्यांची जयंती आहे, त्या कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर

प्रकाश पेरा आपुल्या भोवती,

दिव्याने दिवा पेटत असे,

इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,

शंकच पोकळ फूकू नका,

भलेपणाचे कार्य उगवता,

उगाच टीका करू नका

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल हे दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका करताना, कंत्राटदारांना लाभदायक असलेल्या या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि सर्वसामान्यांची निराशा झाल्याचं म्हटलं आहे.

९९ हजार कोटींची राजकोषीय तूट म्हणजे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जुन्या योजना नव्याने मांडलेला हा अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कढीला त असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्यानं पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यात आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचं सिद्ध होतं, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारनं सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत ते बोलत होते.

****

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या तीन प्रमुख तांत्रिक विभागांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी आगामी गगनयान मोहिमेसाठीच्या अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचन संबंधित विविध पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, यांचा समावेश आहे. कळंब आणि वर्धा तसंच अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या दोन रेल्वे सेवांनाही पंतप्रधान उद्या हिरवा झेंडा दाखवतील.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...