Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार-'मन की बात'च्या
एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन
· राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा
चहापानावर बहिष्कार
· बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
आणि
· रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या
मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन
की बात' या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, वयाची
१८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य
निवडीची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं
मोदी म्हणाले. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय
आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत
कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही
केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव
संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या
चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद
केलं. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन
पर्यटकांच्या निवासाची,
त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी
समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर
देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची
आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन
की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक
तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या
संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल
मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं
पंतप्रधानांनी आवाहन केलं.
****
दरम्यान, देशभरातील विविध आरोग्य
संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज झालं. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती
आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या
कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही
यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते
उद्या "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण
पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायत नगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव
या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत, देशभरातील
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक
नीति सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
कल 26 तारीख को माननीय प्रधानमंत्रीद्वारा
554 स्टेशन्स और 1500 से उपर रेल्वे ओव्हरब्रीज या अंडरपास इनका शीलान्यास, जहां पे
पुरे हो गये है, वहां पे उद्घाटन किया जायेगा। नांदेड डिवीजन में ये 52 जगह पे आयोजन
है। यहां हमारे पास चार स्टेशन्य है जिनका फाऊंडेशन स्टोन लेइंग माननीय प्रधानमंत्री
द्वारा किया जायेगा, जिसमे हिमायतनगर, भोकर, मानवतरोड और रोटेगाव हैं। इसके अलावा
19 आर ओ बी आय यु पी ज् है।
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक
वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण असावे तसंच
याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत. यांसदर्भात शालेय शिक्षण आणि
साक्षरता विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी
मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकं याविषयांवर यावेळी चर्चा
होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा
निर्णय विरोधीपक्षांनी घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी
ही माहिती दिली. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस
नेते बाळासाहेब थोरात,
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी
पार्टीचे अबू आझमी,
शेकापचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व
व्यवहार ऑनलाइन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार
नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या
अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. राज्य आणि
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रिया
ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या
आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे-पाटील यांनी आता आंदोलन स्थगित
करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर
इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र
आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे
पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे. धनगर
समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर
टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली. शिक्षकांचे
समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे
दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, यासारख्या
मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी
पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य
शासनाचे वर्ष २०२०,
२०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतचे
पांडुरंग निवृत्ती डोंगरे,
ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे, भराडखेडा
इथले रामदास शेषराव बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता
दत्तात्रय शिनगारे,
नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे.
एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत
या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू
असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं
दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत
आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावा केल्या.
जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार
गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचा
पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी ४६ धावांची आघाडी
मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडनं भारताला
जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर
आहे.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती
महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात
आलं. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह, महिला
अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शस्त्र प्रदर्शन आणि सर्प
माहिती शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे.
****
No comments:
Post a Comment