Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पाणीपुरवठ्यासंबंधी छत्रपती संभाजीनगर शहराचं हीत लक्षात घेऊन मार्ग काढला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर बोलत होते. शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी सोलरवर चालणारे पंप देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दिल्या जात असलेल्या निधीत समाधानकारक रित्या वाढ केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
दरम्यान, गंगापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज पवार यांच्या हस्ते झालं. मिटमिटा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर जिल्हा दौर्यावर असून, अहमदपूर इथं तीन हजार ९४६ कोटी रुपये किंमतीच्या सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या १२२ कोटी रुपये किंमतीच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन देखील गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मनोहर जोशी यांनी आपल्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी केलेलं कार्य नेहमीच स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं आहे, अशी भावना व्यक्त करुन राज्यपाल रमेश बैस यांनी यांनी जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मनोहर जोशी यांचा पार्थिव देह मुंबईत त्यांच्या विवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. अनुभवाच्या आधारे, मूल्यांकनाचा प्रकार सर्व शाळांमध्ये इयत्ता नववी ते १२ वीच्या इयत्तांसाठी स्वीकारावा का, याविषयी मंडळ निर्णय घेणार आहे. या प्रयोगात कौशल्य, विश्लेषण, सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतांचं मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.
****
देशातून सिकलसेल आजाराचं उच्चाटन करण्यासाठी वेगानं काम करण्याचे निर्देश, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिले आहे. काल मुंबईत आरोग्य क्षेत्रासाठी केंद्राकडून प्राप्त निधी, विविध योजनांच्या प्रगतीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सिकलसेल निर्मुलनासाठी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर तपासणी वाढवण्यात यावी, गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीमध्ये सिकलसेल आजाराची तपासणी सक्तीची करण्यात यावी, यासोबतच क्षयरोगाच्या उच्चटनासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना पवार यांनी दिल्या.
****
राज्यातले बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचं गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. केंद्र शासनाच्या २०१८ च्या अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन २०२० च्या अहवालानुसार तो १६ झाला आहे. तसंच २०२० च्या अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून, महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचं नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचं लक्ष्य गाठलं आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा कसोटी क्रिकेट सामना आजपासून रांची इथं सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या ५ बाद १५० धावा झाल्या होत्या. आकाश दीपनं तीन, तर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा आज सुरु होत आहे. पहिला सामना बांगळुरु इथं मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघादरम्यान होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत पाच संघादरम्यान एकूण २२ सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्चला दिल्लीत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment