Thursday, 29 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.02.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 February 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      राज्य सरकारच्या मोदी आवास घरकुल योजनेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ, यवतमाळ इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी

·      नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

·      संगीत नाटक अकादमीचे गेल्या दोन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर

·      म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर तसंच हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान

सविस्तर बातम्या

राज्य सरकारच्या मोदी आवास घरकुल योजनेला काल यवतमाळ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. याअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या १० लाख लाभार्थ्यांना, येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ मिळेल. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत बचत गटातल्या साडे पाच लाख महिलांना सव्वा आठशे कोटी रुपयांचं खेळतं भांडवल पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात आलं.

आयुष्मान भारत-जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातल्या एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचं वितरण करण्याची योजनाही त्यांनी सुरू केली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचापुढचा हप्ता ८८ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतल्या सहा प्रकल्पांचं आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतल्या ४५ सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही पंतप्रधानांनी काल लोकार्पण केलं.  

 

आज भी यहां बिदर और मराठवाडा के लिऐ पी एम कृषी सिंचाई और बलिराजा संजीवनी योजना के तहेत ५१ प्रोजेक्ट का लोकार्पण हुआ हें। इन से ८० हजार हेक्टर से ज्यादा भुमि को सिंचाई की सुविधा मिलेगी।

 

वर्धा - नांदेड रेल्वेमार्गावरच्या वर्धा ते कळंब या ३९ किलोमीटरच्या, तसंच अहमदनगर-बीड-परळी मार्गावरच्या न्यू आष्टी ते पाटोदा तालुक्यातल्या अमळनेरपर्यंतच्या ३२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचंही पंतप्रधानांनी लोकार्पण केलं. या दोन मार्गावरच्या विस्तारीत डेमो रेल्वे सेवेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. अंमळनेर इथं बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत या डेमो रेल्वे सेवेला प्रारंभ झाला.

****

राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून, दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अहमदनगर इथं नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराला काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या रोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी पाच जिल्ह्यातल्या सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला. या मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या आणि आस्थापना सहभागी झाल्या आहेत.

****


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, राज्यात नुकत्याच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा काल विधानसभेत उपस्थित केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल मागवला असून, तातडीने मदत दिली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

विधानपरिषदेत काल २०२३-२४ च्या आठ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. सभागृहाचं नियमित कामकाज सुरु होताच महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक २०२४ मंजूर करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं.

****

जन्मजात कर्णबधीरत्व दूर करण्याच्या शस्त्रक्रियेसाठीची वयोमर्यादा दोन वर्षावरून पाच वर्षांपर्यंत करावी, अशी मागणी, आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. काल विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी याकडे लक्ष वेधलं. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी शासन पाच लाख वीस हजार रूपयांची मदत करतं, यामुळे जन्मत: कर्णबधीर बालकांना ऐकू येणं शक्य होतं. या वयोमर्यादेत वाढ करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना देखील चव्हाण यांनी पत्र पाठवलं आहे.

****

राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शासकीय तसंच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याबाबतचं परिपत्रक शालेय शिक्षण विभागानं जारी केलं. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.

****

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणप्रकरणी कार्यकर्ते विनोद पाटील यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात, तसंच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं. यापूर्वी राज्य सरकारनं दोन वेळा दिलेलं आरक्षण टिकलं नाही, यंदा या आरक्षणाच्या विरोधात कुणी याचिका दाखल केली तर मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी ही याचिका दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

संगीत नाटक अकादमीचे गेल्या दोन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न विद्यावेतन जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय गायनासाठी कलापिनी कोमकली तसंच देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कारही जाहीर करण्यात आले. यामध्ये अभंग गायनासाठी लातूरचे नागेश आडगावकर यांच्यासह ८० तरुण कलावंतांचा समावेश आहे. नागेश आडगावकर यांनी या पुरस्काराबाबत आपली प्रतिक्रिया या शब्दांत व्यक्त केली...

 

खूप आनंद होतो या गोष्टीचा की मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि संगीत नाटक अकादमीचा धन्यवाद मानतो मला पुरस्कार दिल्याबद्दल, आणि माझे गुरूजी पंडित विठ्ठलराव जगताप आणि राजेंद्र कंदलगावकर सर यांचे आशिर्वाद मानतो आणि मी अजून खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन, प्रयत्न करत राहणार.

 

****

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव इथल्या विविध गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला. ही नोंदणी २७ मार्च च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. येत्या १२ एप्रिलला दुपारी तीन वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर सोडतीचं स्थळ आणि दिनांक पात्र अर्जदारांना कळवण्यात येईल. ९४१ सदनिका आणि ३६१ भूखंडांच्या विक्रीकरता ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

****

परभणी इथं काल केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत, नेहरु युवा केंद्राच्या वतीनं कमलताई जामकर महिला महाविद्यालय़ात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. शाहीर उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार जनजागृती गीत सादर केलं. यावेळी विद्यार्थ्यांना मतदान प्रणालीचं मार्गदर्शन तसंच ऑनलाईन मतदार नोंदणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

****

भटक्या जाती जमातीमधल्या घटकांना त्यांच्या पालावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम काल लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीनं राबवण्यात आला. प्रशासनानं आपल्या दारात येऊन शासकीय योजनांचा लाभ दिल्यानं, बुऱ्हानगर इथल्या पालावरील भटक्या विमुक्तांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकलं. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जवळपास ९० व्यक्तींना विविध लाभांचं वितरण करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या गहू, हरभरा तसंच ज्वारी काढण्याचं काम जोरात सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. जवळपास पाऊण तास झालेल्या या पावसामुळे गव्हाचं मोठं नुकसान झालं. आंब्याचा मोहोर आणि छोट्या कैऱ्यांचंही या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला, अचानक आलेल्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या २९ रास्त भाव दुकानदारांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पाथरी तालुक्यातल्या दोन, जिंतूर- चार, सेलू-एक तर गंगाखेड तालुक्यातल्या सर्वाधिक २२ दुकानदारांचा समावेश आहे. शिधाजिन्नसची रक्कम शासनास जमा केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

धाराशिव इथं उद्या एक मार्च रोजी नमामी गंगे पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या विविध जिल्हयातल्या खास करून डोंगरी भागामध्ये गेल्या ७५ वर्षात पाणी टंचाई जाणवत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजनांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. या प्रसंगी नमामी गंगे पाणी परिषद स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे.

****

अंबाजोगाई इथले प्रतिथयश गायक श्रीधर काळेगावकर यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ११ वाजता अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

No comments: