Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· देशभरातल्या दोन हजारांवर रेल्वे प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी तसंच
लोकार्पण
· विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात;साडे आठ हजार लाख रुपयांच्या
मागण्या सदनासमोर सादर
· ज्येष्ठ गजल गायक पंकज उधास यांचं निधन
आणि
· रांची कसोटीत भारताचा इंग्लंडवर पाच गडी राखून विजय;मालिकेत
अजेय आघाडी
****
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या
सेवा सुविधा असल्या पाहिजेत असं सांगत गेल्या दहा वर्षात नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्याची
गती दुप्पट झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या
हस्ते आज २ हजारांहून अधिक रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे
झालं त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांना रेल्वेस्थानकांवर विमानतळांसारख्या सुविधा मिळत असल्याचं
ते म्हणाले. अमृत भारत स्थानक प्रकल्पांतर्गत त्यांनी देशातल्या ५५३ रेल्वेस्थानकांच्या
पुर्नविकासाच्या कामाची पायाभरणी केली. या स्थानकांमध्ये नांदेड विभागातल्या हिमायतनगर, भोकर, मानवत
रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांसह राज्यातल्या ५६ स्थानकांचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान परवा यवतमाळ
दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता
तसंच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या आणि तिसऱ्या
हप्त्यांचं एकत्रित वितरण होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुमारे ८८
लाख शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला
आजपासून मुंबईत सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ हजार ६०९ कोटी
१७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात मांडल्या. यात अवकाळी पाऊस तसंच
गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईकरता १ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची
तरतूद करण्यात आली आहे. कृषीपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला वीज
देयकाच्या अनुदानासाठी एक हजार ३७५ कोटी रुपयांहून अधिक तरतूद प्रस्तावित आहे.
यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय देण्याची
मागणी विधानसभेत केली. सरकार याप्रकरणी गंभीर आणि सकारात्मक आहे. मात्र आताच सगळ्या
मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह चुकीचा असून थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग
निघेल, असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना
राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषेदत जाहीर केलं.
यात महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक, सार्वजनिक
विद्यापीठ सुधारणा विधेयक,
वस्तू आणि सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक आणि आंतराष्ट्रीय क्रीडा
विद्यापीठ विधेयक यांसारख्या विधेयकांचा समावेश आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे कलमासाठी
मागील १६ दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय मराठा आरक्षण
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आज दुपारी आंतरवाली सराटी इथं झालेल्या
पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर करत, काही भगिनींच्या हस्ते पाणी
पिऊन उपोषण मागे घेतलं. अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या
काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा, तसंच
राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर
जरांगे पाटील यांनी तूर्तास हे उपोषण मागे घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशाचं संविधान कोणत्याही परिस्थितीत बदललं
जाणार नाही,
असा विश्वास देशातील दलित बांधवांना आपण देत असल्याचं, भारतीय
रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी
म्हटलं आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात महायुतीचं जागावाटप
लवकरच होणार असून यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभेच्या दोन जागा मिळाव्यात
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना
आमचा पाठिंबा आहे,
राज्य सरकारनं मराठा समाजासाठी दिलेलं दहा टक्के आरक्षण आता
टिकवण्याची गरज आहे,
त्यासाठी जरांगे पाटील यांनी अतिरेकी भूमिका न घेता सामंजस्यानं
घ्यावं असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यातील विविध हिंसक कारवायांमध्ये
सहभागी असलेल्या एका नक्षल महिलेला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. राजेश्वरी उर्फ
कमला पाडगा गोटा,
असं अटक केलेल्या नक्षलीचे नाव असून, ती
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातल्या बडा काकलेरची रहिवासी आहे.
****
प्रसिध्द गजल गायक पंकज उधास यांचं आज निधन झालं. ते ७२ वर्षाचे होते. १७ मे १९५१
साली गुजरात मध्ये जन्मलेल्या पंकज उधास यांनी गायन क्षेत्रात
आपला वेगळा ठसा उमटवला. नाम चित्रपटातल्या चिठ्ठी आयी है या गीताने पंकज उधास प्रकाश झोतात आले. २००६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात
आलं होतं. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. आज मुंबईत ब्रिच
कँन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. उद्या त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत. उधास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आपल्या गायकीने
गेली चार दशकं संगीत क्षेत्र समृद्ध केलेले उधास यांच्या निधनानं संगीत क्षेत्राची
अपरिमित हानी झाल्याचं,
ठाकूर यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा,
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सावरकरांना
आदरांजली वाहिली. देशाचं स्वातंत्र्य आणि अखंडता कायम रहावी यासाठी वीर सावरकर यांनी
केलेला त्याग आणि समर्पण कायम स्मरणात राहील. त्यांचे कार्य देशातील प्रत्येक नागरिकाला
प्रेरणादायी असेल,
अशा भावना पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरिल आपल्या संदेशात
व्यक्त केल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं समर्थ नगर परिसरात
सावरकर चौकात स्वातंत्र्यवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर इथं सावरकर विचार मंचच्या वतीनं आज जुने बस स्थानक सावरकर चौकात सावरकरांच्या
पुण्यतीथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा
कार्यवाह विजय वाघमारे उपस्थित होते. तुळजापुरात सावरकर चौकामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक
दामोदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीचं निवेदन तुळजापूर नगर परिषदेचे
कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक यांना देण्यात आलं.
****
रांची इथं झालेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी
सामन्यात भारतानं आज चौथ्या दिवशी इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. याबरोबरच भारतानं
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयासाठी १९२
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं कालच्या बिनबाद चाळीस धावांवरून आज चौथ्या दिवसाचा
खेळ सुरू केला. कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक ५५ धावा केल्या तर यशस्वी जैस्वाल ३७
धावा काढून बाद झाला. शुभमन गिलनं नाबाद ५२ तर ध्रुव जुरेलनं नाबाद ३९ धावा केल्या.
इंग्लंडच्या बशीरनं सर्वाधिक तीन तर जो रूट आणि टॉम हार्टलेनं प्रत्येकी एक गडी बाद
केला तर ध्रुव जुरेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला पुढचा आणि अखेरचा
सामना सात मार्चपासून हिमाचल प्रदेशात धरमशाला इथं होणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी ची बस सेवा सकाळच्या
वेळी एक तास बंद करण्यात आली होती. साडे दहा वाजेनंतर हळुहळू बससेवा पूर्वपदावर आली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील इंटरनेट सेवा देखील काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती.
जालना जिल्ह्यातली बस वाहतुक तसंच इंटरनेट सुविधाही सायंकाळपर्यंत पूर्ववत करण्यात
आली.
****
पणन कायद्यातील बदलाविरोधात राज्यातील बाजार
समित्यांनी विरोध दर्शवत आज राज्यस्तरीय बंद पुकारला होता. यात हिंगोली जिल्ह्यातील
सर्व सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे
व्यवहार बंद ठेवण्यात आले. परिणामी, आज कोट्यवधी रूपयांची उलाढाल
ठप्प झाली.
****
मराठी भाषेकरिता व्यापक प्रमाणात अनुवाद
संस्था स्थापन करण्यासाठी समाजातील ज्ञानी लोकांनी एकत्र येण्याची गरज ज्येष्ठ साहित्यिक
रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रा. वा. ल. कुळकर्णी
व्याख्यानमालेत 'मराठी भाषा-काल,
आज आणि उद्या' या विषयावर पठारे बोलत होते.
****
No comments:
Post a Comment