Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबांना मदत करण्याला सरकारचं प्राधान्य - डॉक्टर
निलम गोऱ्हे यांचं प्रतिपादन
· म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
· मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरें कलमाच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी रास्तारोको
आणि
· बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यापासून अयोध्येपर्यंत थेट बस सेवेला प्रारंभ
****
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबांना
मदत करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉक्टर निलम
गोऱ्हे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रोजगार हमी योजना, शैक्षणिक
सवलती, जल व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण विषयावर आज घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्या बोलत
होत्या. पाण्याअभावी स्थलांतर करत असलेल्या कुटुंबासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं
सांगतानाच,
या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत त्यांनी माहिती दिली.
****
म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या
विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ते आज ठाणे इथं कोकण मंडळाच्या म्हाडा सोडत कार्यक्रमात बोलत होते. म्हाडाने वेळेत
गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा
त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना
बक्षीस द्यावे आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या
बिल्डरला दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार
३११ सदनिकांची संगणकीय सोडत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आली.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं अखिल भारतीय
मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते आज झालं,
नाट्यसंस्कृती अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ पैकी ५२ नाट्यगृहांचं
अद्ययावतीकरण तर उर्वरित नाट्यगृहं नव्याने उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कला आणि संस्कृतीशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
****
यवतमाळ इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण
अभियानांतर्गत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज महिला मेळाव्यात मार्गदर्शन
केलं. उमेद अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना राज्य शासनाद्वारे देण्यात
आलेल्या वाढीव मानधनाचं वितरण या मेळाव्यात करण्यात आलं. अभियानांतर्गत उत्कृष्ट काम
करणाऱ्या व्यक्ती,
महिला बचतगटांना कर्ज पुरवठा करणारे बँक अधिकारी तसंच उत्कृष्ट
ग्राम संघ आणि प्रभाग संघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
****
कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता
पक्षाजे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी वाशिम इथं शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
चंद्रकांत ठाकरे,
खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा
पोलिस अधीक्षक अनुज तारे आदी मान्यवरांनी पाटणी यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या
अधिसूचनेतल्या सगेसोयरेंची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज जालना जिल्ह्यात
ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, अंबड, बदनापूर
तालुक्यातल्या मुख्य रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी रास्तारोको करत प्रशासनाला निवेदन
सादर केलं. दरम्यान,
बदनापूर तालुक्यातल्या धोपटेश्वर आणि बाजार गेवराई इथं आंदोलक
आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यामुळे पोलिसांना
सौम्य बळाचा वापर करावा लागला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बदनापूर ठाण्यात
आणल्यामुळे ठाण्याबाहेर मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलकांना
सोडण्याची मागणी केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मराठा
समाजाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं. तुळजापूर- नागपूर या राष्ट्रीय
महामार्गावरील सोनखेड इथं दोन तास आंदोलन केलं. नांदेड- उदगीर रस्त्यावरच्या बाभूळगाव
इथं, नांदेड- हैदराबाद महामार्गावर चंदासिंघ कॉर्नर इथं आंदोलकांनी रास्ता रोको केला.
दरम्यान नांदेड शहरातही आनंदनगर चौकात आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या ५५
माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नुकतच माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, ते काल नांदेड इथं पोहोचले, त्यांनंतर
आज हे पक्षांतर घडून आलं. दरम्यान, भाजपात येण्यासाठी आपण कोणावरही
बळजबरी केलेली नाही,
स्वेच्छेने भाजपात दाखल होणाऱ्यांचं स्वागत केलं जाईल, असं
चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
****
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा
हा एकशे दहावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता
या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या
तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज सकाळी रायगड इथं शरद पवार यांच्या
प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. सध्याचा काळ हा संघर्षाचा असल्याने यात देखील काम करत
राहणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत
पाटील, सुप्रिया सुळे,
जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील
पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'चं पुणे जवळच्या मोशी इथं राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रात
संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं
फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या
पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून
ही दुसरी बस तर मराठवाड्यातून ही पहिली बस आहे. या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती साडे सहा
हजार रुपये प्रवासभाडे निर्धारित करण्यात आलं आहे. आज या एसटी बसला मार्गस्थ करण्यात
आलं.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बेलाटी इथं आज पाचव्या
आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. संत बाळूमामा ट्रस्ट बेलाटी यांच्या
वतीने घेण्यात येत असलेलं हे संमेलन उद्या २५ फेब्रुवारी पर्यंत चालेल. सकाळी ग्रंथदिंडीने
या संमेलनाला सुरुवात झाली. आदिवासी धनगर संस्कृती आणि परंपरांचं यावेळी दर्शन घडलं.
गजनृत्य, झांज, टिपरी,
गजढोल आणि लेझीम पथकांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं उपजिल्हा
रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी दिली असल्याची माहिती, आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते आज धाराशिव इथं बोलत होते. राष्ट्रीय महामार्गावर
दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत असून. अपघातातील रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे, यासाठी
नळदुर्ग इथं ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आपण सातत्याने मागणी केल्याचं पाटील म्हणाले.
****
बीड जिल्हा रुग्णालयात पीएम अभिम अभियानातून
नव्याने बांधण्यात येणाऱ्या ५० खाटांच्या स्वतंत्र क्रिटीकल केअर युनिटचं भूमिपुजन
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांनी आज दिली.
****
कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या
राज्यस्तरीय शेतकरी सन्मान पुरस्कारांमधे धाराशिव जिल्ह्यातल्या नऊ शेतकऱ्यांचा सन्मान
होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा, परंडा तालुक्यातील दोन
तर धाराशिव तालुक्यातील दोन आणि वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा या पुरस्कारार्थींमधे
समावेश आहे. दरम्यान,
धाराशिव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वैभव प्रभाकर लेणेकर
यांना कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर शहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे
तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
लातूर शहरातील साळे गल्ली परिसरात ६ दुकानांना काल रात्री आग लागून मोठं नुकसान झालं
होतं. आज देशमुख यांनी आगीच्या घटनास्थळाला भेट देत नुकसानग्रसाचं सांत्वन केलं. नुकसानग्रस्तांना
शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या
आहेत.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रांची इथं
सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सात बाद दोनशे १९ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल
७३ आणि शुभमन गीलने ३८ धावा केल्या असून भारतीय संघ एकशे ३४ धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी आज इंग्लंड संघ ३५३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजानं चार, आकाशदीप
३, मोहम्मद सिराज २ तर रविचंद्रन अश्विनने एक गडी बाद केला.
****
No comments:
Post a Comment