Wednesday, 28 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.02.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 February 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

विधानसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, राज्यात परवा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल मागवला असून, तातडीने मदत दिली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.

मुंबईच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपचे आशिष शेलात यांनी नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली. मुंबईत झालेल्या विविध विकास कामांवर श्वेतपत्रिका काढण्याची त्यांनी मागणी केली.

दरम्यान, शेतपिकांना योग्य भाव द्या, अशी मागणी करत सरकारने हमीभाव कमी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका करत विरोधी पक्षातल्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडुच्या दौऱ्यावर असून, तुतुकुडी इथं इथं सुमारे १७ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली. देशातल्या दहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७५ दीपगृहांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यटन सुविधांचं लोकार्पण, तसंच भारतातल्या पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील देशांतर्गत प्रवासी जहाजाचं उद्घाटनही त्यांनी यावेळी केलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचन संबंधित विविध पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, यांचा समावेश आहे. या मार्गांवरच्या दोन रेल्वे गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. 

राज्यातल्या सुमारे साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपये फिरता निधी वितरण, आणि एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणासह, ओबीसी प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभही पंतप्रधान करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता ते आज जारी करतील.

****

भारतीय नौदल, अंमली पदार्थ नियंत्रण पथक, आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत गुजरातच्या पोरबंदरमधून अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. तब्बल तीन हजार शंभर किलोचा हा अंमली पदार्थांचा साठा असून ही भारतीय उपखंडातली अंमली पदार्थांची आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

निवडणुकांमधे युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार आजपासून देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधे मेरा पहला वोट देश के लिए हा कार्यक्रम आयोजित करत आहे. राष्ट्राच्या व्यापक हितासाठी मतदानाचं महत्त्व बिंबवणं आणि तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं, हा कार्यक्रमामागचा उद्देश आहे. येत्या ६ मार्चपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या कार्डांचं ई केवायसी करण्याचं काम सुरू आहे. शहरात चार लाख पासष्ट हजार सहाशे पंधरा लाभार्थ्यांना या योजनेची कार्डस् देण्याचं उद्दिष्ट निर्धारित आहे. आतापर्यंत चौऱ्याहत्तर हजार एकशे एक कार्डांचं ई केवायसी काम पूर्ण केल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

****

सोलापूर इथं आज मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी आमृत नाटेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उपस्थितांना निर्भय आणि निर्भिडपणे मतदान करण्याची शपथ दिली. नागरीकांनी या रॅलीत उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

****

अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातल्या महान आणि लगतच्या परिसरात परवा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानाकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी महान परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

****

लातूर जिल्ह्यात औसा इथला पशुधन विकास अधिकारी हिरालाल निंबाळकर आणि उंबडगाव ग्रामपंचायत कार्यालयातला संगणक परिचालक माधव संग्राम येवतीकर यांना एक हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी आणि त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

परभणीच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून लेक लाडकी, ही योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींच्या पालकांनी विहित नमुन्यातले अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्रात सादर करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments: