Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यात मिनी टेक्सटाईल पार्क स्थापनेसाठी अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
· विधीमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
· बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
· बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड
आणि
· इंग्लंडविरूद्धच्या रांची कसोटीत भारताला विजयासाठी १५२ धावांची आवश्यकता
सविस्तर बातम्या
राज्यात लघु-वस्त्रोद्योग संकुल मिनी टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याकरीता अनुदान देण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या योजनेनुसार राज्यात एक हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ३६ हजार प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्यात केंद्र पुरस्कृत “पीएमई-बससेवा” योजनेची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीच्या FAME योजनेंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातल्या २३ महानगरपालिकांचा या योजनेत समावेश आहे.
धान उत्पादकांकरता प्रति हेक्टरी २० हजार रुपये, याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च येईल.
राज्यातल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत, त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एक एप्रिल, २०२२ पासून ते ग्रॅज्युईटीचा निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणं, या प्रकरणी हा लाभ देण्यात येईल.
जुने रोहित्रं बदलण्यासाठी निरंतर वीज योजना, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ, दिव्यांग जिल्हा समन्वयकांसह विशेष तज्ज्ञ शिक्षक आणि विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणं, धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट, आदी निर्णयांना काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल आयोजित चहापान कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, गेल्या दीड वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली, मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे, इतर मागास वर्ग अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कायदा कोणीही हातात घेऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, सरकारनं आयोजित केलल्या या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. राज्यातलं सरकार फसवं असून जनतेला न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल मुंबईत घेतेलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. जनतेच्या प्रश्नांबाबतची असंवेदशीलता, तसंच निधी वाटपात प्रचंड भेदभाव केला जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काल जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे प्रस्थान केलं. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काल सायंकाळी अंबड तालुक्यातल्या भांबेरी ग्रामस्थांनी जरांगे यांना थांबवून प्रकृतीची काळजी घ्या त्यानंतर पुढील दिशा ठरवू, अशी विनवणी केली. रात्री उशिरा मराठा समाजबांधवांनी बैठक घेऊन चर्चा केली. भांबेरी इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आहे. आज सकाळी ते मुंबईकडे रवाना होणार आहे.
****
दरम्यान, मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते काल सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
****
देशभरातल्या विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झालं. राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या, १३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन, तसंच राज्यातल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात आलं.
बीड इथं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, तर अहमदनगर इथं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायतनगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
****
आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागातून पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं, ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं, पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत, `हॅशटॅग मन की बात`च्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत काल चर्चा केली. शिक्षकांचं समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणं, यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी यावर्षी इन्स्पायर अवॉर्ड पटकावला आहे. एकाचवेळी इन्स्पायर अवॉर्ड पटकवणारी कुर्ला जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातली एकमेव शाळा ठरली आहे. इयत्ता सातवीतला समर्थ गुंड, इयत्ता सहावीतले कार्तिक कानडे, तसंच दीपाली मार्कंड आणि रूपाली मार्कंड या जुळ्या बहिणींचा यात समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी मार्गदर्शन केलं. केंद्र शासनातर्फे सहा लाख विद्यार्थ्यांमधून नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या 'सुपर ६०' विद्यार्थ्यांना, इन्स्पायर अवॉर्ड दिला जातो. हे ६० विद्यार्थी दरवर्षी टोकियो इथं आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडले जातात.
****
ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक -नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या चिखली इथं, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन विस्तारित कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. बॅंकिंग व्यवस्थेचा अभ्यास करून त्यात सुधारणांचा प्रयत्न करत असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहिर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण डोंगरे, कर्जतचे पांडुरंग डोंगरे, ठालेवाडीचे उदयसिंग चुंगडे, भराडखेडा इथले रामदास बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता शिनगारे, नंदापूर इथले रामेश्वर उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे.
एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं जालना जिल्हा कृषी विभागाने म्हटलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयासाठी १५२ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले. पहिल्या डावातल्या आघाडीच्या बळावर इंग्लंडने भारताला जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं. काल तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment