Tuesday, 27 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.02.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 February 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्या प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. आकसापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत, विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले.

एकमताने मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते न्यायालयात टिकणार, असं ते म्हणाले. जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, आरक्षण दिल्यानंतरही समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी बोलणं, त्यांच्यावर आरोप करणं, या गोष्टी चुकीच्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याची मागणी करणं योग्य नाही, असंही त्यांनी नमूद केलं. जरांगे यांना राजकीय पाठिंबा असून, याची चौकशी करुन सत्य समोर आणू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, राज्यातल्या कायदा आणि सुव्यस्थेच्या गंभीर प्रश्नांबाबत सभागृहाचं लक्ष वेधलं. जरांगे यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

तत्पूर्वी या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं.

विधानसभेतही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर चर्चा झाली. यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना भाजपचे आशिष शेलार यांनी, जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्र्यांबद्दल जरांगे यांनी चुकीची वक्तव्यं केली, त्यांनी सरकारला धमकी दिली, त्यांच्या या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा आहे, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या आंदोलनाची एसाआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जरांगे आपल्याविरुद्ध बोलल्यावर मराठा समाज आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. आपली जरांगे यांच्याबद्दल काहीही तक्रार नाही, मात्र या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे, हे समजलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. सगळी चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, राज्याचा अंतिरम अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, चार हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही यावेळी होईल. राज्यातल्या १३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, तसंच यवतमाळ शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरणही त्यांच्या पंतप्रदानांच्या हस्ते होणार आहे.

****

राज्यात नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचं उद्घाटन काल मुंबईत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. सर्व जिल्ह्यांमध्ये आता ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून, यामुळे रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार असल्याचं, सावंत यावेळी म्हणाले. हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

****

राज्यात आय सी डी एस योजनेअंतर्गत ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचा-यांना १ एप्रिल २०२२ पासूनचा एकरकमी लाभ मिळणार असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी १ लाखापर्यंत तर मदतनीसांना प्रत्येकी रुपये ७५ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. भविष्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाला तर एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असंही तटकरे यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातल्या सांगवी भादेव इथला ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार याला २५ हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. दलित वस्ती सुधार योजनेतून झालेल्या नाली कामाच्या प्राप्त देयकातून ५ टक्के रक्कम त्यानं मागितली होती.

परभणी इथल्या परिवहन कार्यालयात एका खासगी इसमाने वरिष्ठ लीपिकासाठी पंचासमक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. शॉप अक्टचं लायसन्स सोबत कच्चा परमीट काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

नांदेड शहर तसंच जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आधार संबधी सर्व सुविधा देण्यासाठी नांदेड टपाल विभागामार्फत येत्या १४ मार्च पर्यंत 'आधार शिला २' नावाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातल्या टपाल कार्यालयात आधार नोंदणी आणि आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

No comments: