Wednesday, 28 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:28.02.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 February 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर;पाच हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण

·      आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर

·      मराठा आरक्षण निर्णयाची अंमलबजावणी;आंदोलन प्रकरणी एसआयटीद्वारे चौकशीचे निर्देश

आणि

·      धुळे जिल्ह्यातले चैत्राम पवार यांना, पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

 

सविस्तर बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचन संबंधित विविध पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचं उद्घाटन तसचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, यांचा समावेश आहे. या मार्गांवरच्या दोन रेल्वे गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. 

राज्यातल्या सुमारे साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपये फिरता निधी वितरण, आणि एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणासह, ओबीसी प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभही पंतप्रधान करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता ते आज जारी करतील.

दरम्यान, आज २८ फेब्रुवारी हा दिवस देशभरात पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.

****

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर केला. सर्वसमावेशक विकासाला गती देणं, तसंच शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्याक, उद्योजक, आदी सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी मिळवून देणं हे या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं पवार यांनी सांगितलं. महसुली जमा आणि तुटीबाबत बोलताना अर्थमंत्री पवार म्हणाले..

 

महसुली जमा चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन कोटी रूपये, महसुली खर्च पाच लाख आठ हजार चारशे ब्याण्णव कोटी रूपये प्रस्तावित आहे. परिणामी नऊ हजार सातशे चौतीस कोटी रूपयाचा महसुलीचा तूट अपेक्षित आहे. सन २०२४-२५ ची राजकोषीय तूट नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रूपये आहे.

****

सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपये खर्चाच्या या अर्थसंकल्पातून राज्यातली गुंतवणूक वाढवण्यावर भर दिल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. निर्यात वाढीसाठी राज्यात पाच इंडस्ट्रिअल पार्क्स ची निर्मिती करणार असून, मेक इन इंडिया अभियानासाठी १९६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १४५ शहरांतले ३१२ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ५ हजार ७०० गावांमधल्या १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करून त्यातून साडेआठ लाख नवे सौर कृषी पंप बसवण्यात येणार असून, सगळ्या उपसा सिंचन योजनांचं येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपये तर जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिवसह नव्या तीन रेल्वे मार्गांचं भूसंपादन सुरू करण्यात येणार असून, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर यासह चार नवीन रेल्वे मार्गांकरता तसंच जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आदी रेल्वे मार्गांकरता ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यात येणार आहे.

या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन विभागासाठी एक हजार चारशे बत्तीस कोटी, उद्योग एक हजार एकवीस कोटी, महिला आणि बाल कल्याण - तीन हजार एकशे सात कोटी, रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी, सहकार - एक हजार नऊशे बावन्न कोटी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता - तीन हजार आठशे पंचाहत्तर कोटी, ग्रामविकास  नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी, मदत आणि पुनर्वसन - सहाशे अडुसष्ट कोटी, दिव्यांग कल्याण -एक हजार पाचशे सव्वीस कोटी, तर गृहनिर्माण विभागासाठी एक हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

क्रीडा विभागासाठी पाचशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करतानाच, राज्यातल्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत घसघशीत वाढ केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

 

जुन्नर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालयाची उभारणी, संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तसंच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना, सर्व जिल्ह्यांमध्‍ये १५ खाटांचं अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर, २३४ तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये डायलिसीस सेवा केंद्र, राज्यात नवीन दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रं, प्रत्येक महसुली विभागात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी, औंढा नागनाथ तसंच माहूर इथं तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरं आणि बारवांचं जतन तसंच संवर्धन योजनेसाठी ५३ कोटी रुपये तसंच धाराशीव जिल्हयात संत गोरोबाकाका स्मारकासाठी भूखंड आणि निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबाला एका साडीचं मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहिर केलं.

जालना आणि हिंगोलीसह राज्यात अकरा ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्नित ४३० खाटांची रुग्णालयं उभारण्यात येणार असून, लातूरसह सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी परिचर्या महाविद्यालयं सुरू करण्याचं या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लोणार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ, अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा तसंच कळसूबाई, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं .

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल, हे दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, तर कंत्राटदारांना लाभदायक असलेल्या या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि सर्वसामान्यांची निराशा झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

९९ हजार कोटींची राजकोषीय तूट म्हणजे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली, तर प्रत्येक अधिवेशनात सरकारला पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यात आर्थिक शिस्त बिघडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

****

हा अंतरिम अर्थसंकल्प विकासोन्मुख दिशादर्शक असल्याचं, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर-मसिआचे अध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक विधेयकाला, राज्यपाल रमेश बैस यांनी संमती दिली आहे. यासंदर्भातलं राजपत्र राज्य सरकारनं काल प्रसिद्ध केलं. २६ फेब्रुवारी रोजी रिक्त असणाऱ्या आणि रिक्त होणाऱ्या पदांच्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू होईल.

****

मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्या प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत केली. आरक्षण दिल्यानंतरही समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याची मागणी करणं योग्य नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. जरांगे यांना राजकीय पाठिंबा असून, याची चौकशी करुन सत्य समोर आणू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

वन, वानिकी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा इथले चैत्राम पवार यांना, पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. चंद्रपूर इथं येत्या एक ते तीन मार्च दरम्यान होणाऱ्या ताडोबा महोत्सवात पवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 

****

मराठवाड्यातले काँग्रेस नेते बसवराज पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परवा त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

****

मराठी भाषा गौरव दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार डॉ.रवींद्र शोभणे यांना, तर श्री.पु.भागवत पुरस्कार पुणे इथल्या मनोविकास प्रकाशनला काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात गोरठा इथं काल चौथं साहित्य संमेलन पार पडलं. डॉ. तरू जिंदल यांना काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद आणि भोकरदन तालुक्यात परवा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी केली. दरम्यान, आमदार संतोष दानवे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून, शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.

****

नांदेड विमानतळाचा परवाना नागरी उड्डयन विभागानं पुन्हा बहाल केला आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही माहिती देत, नांदेडहून दिल्ली आणि मुंबईला विमानसेवा लवकरच सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर इथं काल निवडणूक पथक प्रमुखांची बैठक घेण्यात आली. सर्व पथक प्रमुखांनी सजग राहून आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

****

नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे रुळांच्या कामासाठी नांदेड-मनमाड-नांदेड एक्सप्रेस २४ मार्चपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. नगरसोल-काचीगुडा एक्सप्रेस २४ मार्चपर्यंत सेलू ते नांदेड दरम्यान १२० मिनिटं उशिरा धावणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...