Saturday, 24 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.02.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 February 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यात दोन लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगाराचं उद्दिष्ट-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      उद्योग तसंच कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी दोन आठवड्यात पॉवर सबसिडी धोरण-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि 

·      छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील दोन कर्मचारी लाचखोरी प्रकरणात बडतर्फ

सविस्तर बातम्या

नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यात दोन लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल लातूर इथं छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचं उद्‌घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर इथल्या या महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यात इतर विभागातही अशा मेळाव्यांचं आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक संघ म्हणून हे मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश यावेळी दाखवण्यात आला.  मराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिल्याचे गौरवोद्‌गार फडणवीस यांनी काढले.

दरम्यान, काल या मेळाव्यात करिअर मार्गदर्शन करण्यात आलं. आज रोजगार इच्छुक युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी मराठवाड्यातील १६ हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे.

****

माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काल मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसंच अनेक आमदार आणि खासदारांनी जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तीक्ष्ण बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यामुळे सगळ्या पक्षांतल्या नेत्यांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळालं, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी जोशी यांच्या कार्याला उजाळा दिला.

शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी लक्षणीय कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून नेलं, ‌असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनोहर जोशी यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

****


वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं काल सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. १९९७ ते २००३ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. २००४, २०१४ आणि २०१९ मधे त्यांनी कारंजा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं.

****

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या शेतकरी आणि शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. २०२१ ते २०२३ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित दिले जाणार आहेत. या पुरस्काराच्या रकमेतही तब्बल चार पटीने वाढ केल्याची माहिती मुंडे यांनी दिली. 

****

वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पुणे इथले माऊली बाबा टाकळकर यांना या वर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. येत्या २८ मार्च रोजी जिल्ह्यातल्या लोणी इथं हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

****

आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे दहावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.

****

विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योग तसंच कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात पॉवर सबसिडी धोरण जाहीर करणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल नागपूर इथं राज्य शासन आणि पेर्नोड रिकार्ड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. परकीय थेट गुंतवणुकीतील ४५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

****


दिव्यांगांच्या अडीअडचणी आणि विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली, त्यावेळी पवार बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथं अंबाजोगाई पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या १७ व्या शाखेचं उद्घाटन तसंच गंगापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते काल झालं.

****

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यात विविध विकासकामांसह सहा राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. काश्मीर ते कन्याकुमारी या ५० हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. उदगीर वळण रस्त्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करणार असून औसा वळणरस्ता करण्याची घोषणाही गडकरी यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील १७४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. लातूर ते टेंभुर्णी या धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन चौपदरीकरण केलं जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात बडतर्फ करण्यात आलं आहे. कंत्राटी अभियंता प्रेमनाथ मोरवाल आणि वसुली कर्मचारी साईनाथ राठोड अशी त्यांची नावं आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी ही कारवाई केली. सहाशे चौरस फुटाच्या घराच्या करनिश्चितीसाठी या दोघा कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. सबंधित सहायक आयुक्तांनाही प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या जलसंपदा विभागातल्या कारकुनाला काल तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. शेख वसीम असं या कारकुनाचं नाव आहे. जलसिंचन विहिरीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी त्याने ही लाच मागितली होती.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यासह राज्यभरात आज सकाळी १० ते १ या वेळेत रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेतील सगेसोयरेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं समाजबांधवांची बैठक घेतल्यानंतर पुढील आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

****

बीड इथं आज महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडासंकुलात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कृषी महोत्सव, विभागीय सरस महोत्सव आणि नवतेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल बीड इथं दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झालं. 

****

परभणी इथं दोन दिवसीय 'परभणी ग्रंथोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या विद्यमाने हा ग्रंथोत्सव भरवण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत लखपती दिदी कामाबाबात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल आढावा घेतला. लखपती दिदी योजनेचं उद्दिष्ट साध्य करणं, संभाव्य लखपती दिदीची ओळख आणि त्याचं प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडची मतदानाची टक्केवारी मात्र अनेक जिल्ह्यापेक्षा कमी राहते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान कराव, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. जिल्हास्तरीय मतदान जनजागृती अभियानाच्या प्रचार प्रसार मोहिमेला गतिशील करण्याचे आदेश त्यांनी दिले.

****

नांदेड इथं राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या जलरथाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...