Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
देश हा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्धी कडे वाटचाल करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सहकारीता क्षेत्रातल्या विविध परियोजनांची पायाभरणी तसंच लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सहकार क्षेत्रात ११ राज्यांच्या ११ प्राथमिक कृषी पतसमिती पैक्सच्या, जगातील सर्वात मोठ्या धान्य भंडार योजनेच्या पायलट प्रकल्पाचं उद्धाटन तसंच देशातल्या १८ हजार पैक्स संगणकीकृत परियोजनांचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण महत्त्वाचं असून शेतकरी आणि शेतीसंबंधीत मुळं मजबुत करणं हे या सहकार क्षेत्राचं मुख्य उद्दीष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासोबतचं देशात दोन लाख सहकारी समिती बनवण्याचं उद्दीष्ट समोर असल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
***
देशातल्या सर्वात मोठ्या सरंक्षण उपकरण प्रदर्शनाचं पुण्यात मोशी इथं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्धाटन होणार आहे. या प्रदर्शनाला भारतीय सरंक्षण दलाच्या तीनही सेनादलाचे प्रमुख तसंच वरिष्ठ अधिकारी भेट देणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शना अंतर्गत सरंक्षण क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन आणि परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
***
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यानिमित्त नवी दिल्लीत एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून अक्षर, शब्द आणि भाषा असा याचा विषय आहे. हे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. भाषा आणि सांस्कृतीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी, युनेस्कोनं १७ नोव्हेंबर १९९९ ला २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
***
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे दहावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
***
गुरु रवीदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
गुरु रवीदास यांनी संपूर्ण जीवन, जाती आणि सामाजिक भेदभाव निर्मूलन तसंच प्रेम आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी समर्पित केल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या अभिवादनपर संदेशात म्हटलं आहे. तर समानता आणि सद्भावावर आधारीत गुरु रवीदासांचा संदेश समाजातल्या प्रत्येक पीढीला सदैव प्रेरणादायी राहील असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
***
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज सकाळी रायगड इथं शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. सध्याचा काळ हा संघर्षाचा असल्याने यात देखील काम करत राहणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ही दुसरी बस तर मराठवाड्यातून ही पहिली बस आहे. आज या एसटी बसला मार्गस्थ करण्यात आलं.
***
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात आज सकाळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. हिंगोली तालुक्यातील सिरसम इथले भाविक माळहिवरा फाटा इथल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात असतांना, हिंगोलीकडून अमरावतीकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मनोज इंगळे, बालाजी इंगळे, सतीष थोरात, वैभव कामखेडे अशी या अपघातातल्या मृतांची नावं आहेत. जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे
***
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रांची इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतानं एक बाद ६८ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल ४० आणि शुभमन गील २५ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी आज इंग्लंड संघ ३५३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजानं चार, आकाशदीप ३, मोहम्मद सिराज २ तर रविचंद्रन अश्विनने एक गडी बाद केला.
***
No comments:
Post a Comment