Thursday, 29 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

·      पीएम सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

·      राज्यातल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला मिळणाऱ्या कर्जाची हमी मर्यादा कायमस्वरुपी करण्याचा निर्णय.

·      राज्याच्या आरोग्य विभागातल्या गट-अ या संवर्गातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश वितरीत.

आणि

·      नांदेड महापालिकेचा एक हजार १६७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर.

****

पीएम सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. छतांवर सौर पॅनल बसवण्यासाठी आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट्सपर्यंत  मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी ७५ हजार २१ कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. पंतप्रधानांनी या महिन्यात १३ तारखेला ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या ६० टक्के आणि दोन ते तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या ४० टक्के केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाईल. सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य विक्रेत्याची निवड करता येईल.

खरीप हंगाम २०२४ साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर पोषण आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत तीन नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

राज्यातल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला मिळणाऱ्या ५०० कोटी रुपये कर्जाची हमी मर्यादा, आता कायमस्वरुपी करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून ही कर्जयोजना राबवण्यात येते. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. राज्यातल्या अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निर्णयासाठी आभार मानले आहेत.

****

विधानसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा असल्याचं सांगितलं. राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

****

मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदनं आढळल्याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी, वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठिशी घालणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं असून, हे सॉफ्टवेअर सगळया विद्यापीठांना देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. यामुळे शिक्षकाने कोणत्याही भाषेत शिकवलं तरी मातृषाभेतूनच विद्यार्थ्याला ते समजू शकेल, असं हे सॉफ्टवेअर असल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. या सुधारीत विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवीअभ्यासक्रम चार वर्षांचा केला जाणार असून, तो पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे. या दरम्यान एकावेळी अनेक भाषा किंवा कौशल्य आत्मसात करणं सोपं होईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या किनारी मार्गाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते. यावेळी विरोधकांनी उद्योग विभागावर केलेले आरोप सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावले. महायुती सरकारच्या काळात गेल्या १६ महिन्यात महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत आणि उद्योग जगतात क्रमांक एक वर राहिला आहे, आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातल्या गट-अ या संवर्गातल्या एक हजार ४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश देण्यात आले. आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवली असून, सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुंबई इथं झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कोणत्या आणि किती जागा लढवायच्या याबद्दल या बैठकीत चर्चा झाली असल्याचं कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. निवडून येण्याची क्षमता हेच महाविकास आघाडीचं सूत्र आहे, अद्याप जागा वाटपाचं काहीही ठरलेलं नसून वंचित आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - एनटीपीसीच्या, एनटीपीसी हरित ऊर्जा मर्यादित - एनजीईएल या कंपनीनं, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीशी म्हणजे महाजेनकोशी नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी करार केला आहे. या संयुक्त कराराअंतर्गत तयार होणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. एनटीपीसीच्या दिल्ली मुख्यालयात महाजेनकोचे संचालक अभय हरणे आणि एनजीईएलचे मुख्य महाव्यवस्थापक व्ही. व्ही. शिवकुमार यांनी सह्या केल्या.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी असलेल्या संबंधाची चौकशी केल्यानंतर, अखेरीस नाशिक पोलीसांनी बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २०१६ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सलीम कुत्ता समवेत बडगुजर हे ऑर्केस्ट्राच्या गाण्यावर नाचताना तसंच पुष्पगुच्छ देतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात विधीमंडळात भाजप आमदार नीतेश राणे यांनी आरेाप केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक - एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. नाशिक पोलीसांनी १८ जणांची चौकशी करून जबाब घेतले, त्यानंतर बडगुजर यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

अमेरिका, चीन, जपान या देशांच्या तुलनेत भारतात महागाई अत्यंत कमी असून, ती पूर्णपणे नियंत्रणात आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था चांगली असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते आज पंढरपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. कोरोना काळात दिलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळे नंतर अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे उभी राहीली आहे, असं ते म्हणाले.

****

नांदेड महापालिकेचा एक हजार १६७ कोटींचा अर्थसंकल्प आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. कोणतीही करवाढ न करता शहरवासीयांना सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचं डोईफोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, निवृत्ती वेतन यासाठी १९८ कोटी रुपये तसचं सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि सोयीसुविधांसाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

****

धुळे शहरातल्या आझादनगर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आरिफ अली सैय्यद याला आज धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४० हजार रुपयांची लाच घेतांना आज रंगेहात पकडलं. दोन कोटींची विमा रक्कम फसवणूक प्रकरणात न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.

****

नाशिक इथं वन हक्क दावे मंजुर करावेत आणि अन्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या वतीनं महामुक्काम आदिवासी आंदोलन करण्यात येत आहे.

****

No comments: