आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस. चौकलिंगम् यांची नियुक्ती केली आहे. श्रीकांत देशपांडे यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली. एस. चौकलिंगम् सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
***
खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनानं येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.
***
टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येनं ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढवण्यासाठी शासनामार्फत शिबिरंही घेणार असल्याचं कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काल सांगितलं आहे. कामगारांना प्रशिक्षण, व्यवसायासाठी साहित्य, आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीनं कार्यवाही सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं
****
नांदेड महापालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. मुख्य सभागृहात आयोजित अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे अर्थसंकल्प सादर करतील.
****
बीड जिल्ह्यातल्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी उद्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर याबाबत नोंदणी करुन ऑनलाईन मुलाखती द्याव्यात, असं आयोजकांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत उद्या ‘मराठी बाणा’ आणि स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment