Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्यांना, यापुढील १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक बनणार असल्याचं मोदी म्हणाले. जेवढ्या जास्त संख्येनं युवक-युवती मतदान करतील त्याचे परिणाम देशासाठी तेवढेच लाभदायक ठरतील असंही ते म्हणाले. आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम थांबवावा लागणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक आणि देशाच्या यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या सामाजिक संपर्क माध्यम संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रीया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्दे यू-ट्यूब शॉर्टच्या स्वरुपात छोट्या चित्रफिती सादर करण्याबाबतही पंतप्रधानांनी आवाहन केलं. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मीती पारितोषिक देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहिर केलं. आठ मार्च या दिवशी असलेल्या अंतरराष्ट्रीतय महिला दिनाचा उल्लेख करत मोदी यांनी देशाच्या विकास यात्रेत महिला शक्तीच्या योगदानाला नमन करण्याची ही एक संधी असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी यावेळी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. कृत्रिम बुद्धीमत्ता-ए.आय.च्या वापरातून भ्रमणध्वणीवर वाघांच्या वावराबाबत मिळणारी माहिती याबाबतही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवा-याची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचं सांगून मातृभाषेसाठी देशाच्या विविध भागात काम करणा-या व्यक्तिंचीही माहिती दिली.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२चे विविध कृषी पुरस्कार जाहिर झाले आहेत. जिल्ह्यामधील बाजी उम्रदच्या श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतच्या पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीच्या उदयसिंग सुखलाल चुंगडे यांना २०२०-२१ साठीचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहिर झाला आहे. २०२२साठीचा हा पुरस्कार बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे यांना जाहिर झाला आहे. २०२२मधल्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सूचिता दत्तात्रय शिनगारे, उद्यान पंडित पुरस्कारासाठी नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं जालना जिल्हा कृषी विभानं म्हटलं आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या प्रारंभ होत आहे.या अधिवेशनात पुरवणी मागण्या,त्यावरील चर्चा तसंच पुरवणी यासह लेखानुदान विनियोजन विधेयकं,शासकीय विधेयकं यांवर चर्चा होईल. आवश्यक खर्चाची तरतूद असणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडणी - त्यावरील चर्चा आणि त्याची मंजुरी या अधिवेशनात होणार आहे.
****
बीड इथं आयोजित महा संस्कृती महोत्सवानिमित्त आज पतंग महोत्सव झाला. शहरातल्या पोलीस मुख्यालय क्रीडांगण इथं या महोत्सवास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे उपस्थित होत्या. महिलांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.
****
येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी थोड्या वेळापुर्वी पर्यंत इंग्लंडनं आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद ५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने पहिल्या डावात ३०७ धावा केल्यानं इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे. आज सकाळी भारतानं आपला पहिला डाव कालच्या सात बाद २१९ धावसंख्येवरुन पुढं सुरू केला. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनं चार षटकार आणि सहा चौकारांसह आकर्षक ९० धावां केल्या. शोएब बशीरनं पाच तर हार्टलीनं तीन गडी बाद केले.
****
No comments:
Post a Comment