आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले, आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारं, एक शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जोशी यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सकाळी वार्ताहरांशी संवाद साधला. मराठवाडा जिल्हानियोजन समितीद्वारे जिल्हा विकासासाठी जो निधी दिला जातो, त्यात वाढ केली जाणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील १७४ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आज केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये धाराशिव शहरातल्या १७ किलोमीटर लांबीच्या सर्व्हिस रस्त्यासह ते जावळे रस्त्याचं दुपदरीकरण, येडशी इथला उड्डाणपूल आणि सिंदफळजवळील लातूररोड जंक्शन उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment