आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
विधानसभेत आज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर होत आहे. यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना भाजपचे आशिष शेलार यांनी, जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरांगे यांनी चुकीची वक्तव्यं केली, त्यांनी सरकारला धमकी दिली, त्यांच्या या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा आहे, यासंदर्भात विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली.
दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
****
कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आज राज्यात मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त आज नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या गोरठा इथं चौथं मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. लेखिका, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होत आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने प्रतिष्ठेचा वि. वा. शिरवाडकर विशेष लेखन पुरस्कार अशोक हांडे यांना, तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना देण्यात येणार आहे. परीषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या अठराशे कोटी रुपयांच्या तीन महत्वाच्या अंतराळ क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देणार असून, याठिकाणी तीन प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत.
****
राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी आज उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये मतदान होत आहे. ५६ जागांपैकी ४१ जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली असून, यात महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment