Friday, 1 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 01.03.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेनं मोठी झेप घेतली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनात आठ पूर्णांक चार टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रात ११ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जीडीपीमधली जोमदार वाढ भारतीय अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य आणि क्षमता दर्शवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे. शहरी सहकारी बँकांसाठीची ही एकछत्री संस्था असून, या क्षेत्राचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण हा यामागचा उद्देश आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं काल ओडिशातल्या चंडिपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावरुन अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवीन क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना आणखी चालना मिळेल, असं सांगून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

****

जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत काल झाला. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसंच गाव दत्तक प्रकल्पांच्या माध्यमाद्वारे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विद्यापिठांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

****

माजलगावच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सुधाकरराव तालखेडकर यांचं आज परभणी इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. प्रारंभी महसूल खात्यात कार्यरत तालखेडकर यांनी अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात दीर्घकाळ हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज परभणी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.

****

No comments: