Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या आठ मतदारसंघांचा समावेश
· पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली
· शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर, तर भाजपची अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी
· लातूर तालुक्यातल्या गंगापूर आणि पेठ गावात भूकंपाचे सौम्य धक्के
आणि
· पाच कोटी १४ लाख रुपयांची पाणी पट्टी थकल्याने मांजरा धरणावरून अंबाजोगाई शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबतची अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यांमधल्या ८९ लोकसभा मतदार संघांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली आणि नांदेडसह, राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम आणि वर्धा या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघात आजपासून चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात विदर्भातल्या पाचही मतदार संघातून १८३ उमेदवारांनी २२९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये रामटेक मतदार संघातून एकेचाळीस जणांचे एकावन्न, नागपूर चोपन्न जणांचे बासष्ठ, भंडारा-गोंदिया चाळीस जणांचे एकोणपन्नास, गडचिरोली-चिमूर बारा जणांचे एकोणीस, तर चंद्रपूर मतदार संघातून छत्तीस जणांचे अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून, येत्या तीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, नागपूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. रामटेकचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे, भंडारा-गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनीही काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
****
भारतीय जनता पक्षानं अमरावती मतदार संघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षानं काल पत्र जारी करून ही घोषणा केली. नवनीत राणा यांनी काल युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
****
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उस्मानाबाद मतदार संघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव यांना तर हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली मतदार संघातून उमेदवारी घोषित झाली आहे.
त्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील, उत्तर पश्विम मुंबई - अमोल किर्तीकर, ठाणे - राजन विचारे, रत्नागिरी- सिंधुदुर्ग - विनायक राऊत, बुलडाणा - नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम -संजय देशमुख, मावळ - संजय वाघेरे-पाटील, सांगली - चंद्रहार पाटील, शिर्डी -भाऊसाहेब वाघचौरे, तर नाशिक इथून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे.
****
दरम्यान, ठाकरे गटाच्या या यादीवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. सांगली आणि मुंबईतल्या ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू होती, तिथलेही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आघाडी धर्माचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे, असं आपलं मत असून, ठाकरे गटानं या जागांबाबत फेरविचार करावा, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूकीत ओबीसी महासंघाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत, आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अकोल्यातून आपण स्वत: निवडणूक लढवणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. बुलडाण्यातून-वसंत मगर, अमरावती - प्राजक्ता पिल्लेवान, चंद्रपूर - राजेश बेले, भंडारा-गोंदिया - संजय केवट, गडचिरोली-चिमूर - हितेश मडावी, वर्धा - राजेंद्र साळुंके, तर यवतमाळ-वाशिम इथून खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. आज पत्रकार परिषद घेऊन या बैठकीतल्या चर्चेबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम काल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. आजपासून दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनानं पूर्वतयारी केली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेशी निगडित सर्व कामं या कक्षातून होणार आहेत. विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या नामनिर्देशन कक्षाची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
****
नांदेड लोकसभा मतदार संघातही आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यात नोंद झालेल्या मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ असून मतदानासाठी ३ हजार ८१ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल ग्रामीण मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी आणि मास्टर ट्रेनर्स यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून महाराष्ट्रातून अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, अशी मागणी, काँग्रेस पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस अनिल पारखे यांनी केली आहे. याबाबतचं पत्र पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवण्यात आलं आहे. राज्यात इंडिया आघाडीच्या ४८ उमेदवारांपैकी किमान तीन उमेदवार मुस्लिम असावेत, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
लातूर तालुक्यातल्या गंगापूर आणि पेठ गावात काल दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर तालुक्यातल्या मौजे गंगापूर आणि मौजे पेठ या दोन गावांत असल्याची नोंद, भूकंपमापक यंत्रावर झाली आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथं काल दुपारी भूगर्भातून मोठा आवाज झाला. मात्र भूकंपमापक यंत्रावर याची कोणतीही नोंद झाली नाही.
****
अंबाजोगाई नगरपरिषदेकडे पाणी पुरवठा योजनेची पाच कोटी १४ लाख रुपयांची पाणी पट्टी थकल्याने मांजरा धरणावरून अंबाजोगाई शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी पट्टी भरण्यासंदर्भात सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यात विहिर अधिग्रहण, तात्पुरता पाणी पुरवठा आणि टंचाई निवारणासाठीची कामं प्राधान्यानं राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य टंचाईच्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे तालुकानिहाय आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात २३८ गावं तसंच ४५ वाड्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १६८ गावांमध्ये १९१ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं असून, जायकवाडी प्रकल्पात २२ पूर्णांक ५४ टक्के इतका जलसाठा तसंच ११४ मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये २० पूर्णांक ७९ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या
देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या, स्थापत्य अभियांत्रिकी तसंच विद्युत आणि दूरसंचार
या दोन विद्याशाखांना, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडीएशन -एन.बी.ए. मानांकन मिळालं आहे.
‘नॅक’चा ‘ए’ ग्रेड, ‘एन.ए.बी.एल.’चं मानांकन आणि ‘एन.बी.ए.’चं मानांकन, हे तिन्ही मानांकन मिळवणारं देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय
मराठवाड्यातलं एकमेव महाविद्यालय
ठरला आहे.
****
No comments:
Post a Comment