Tuesday, 26 March 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 March 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक२६ मार्च २०२४ सायंकाळी .१०

****

·      अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द

·      लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस; विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग

·      लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

आणि

·      लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर यात्रेची फटाक्यांच्या आतिषबाजीनं सांगता

****

अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्दबातल ठरवली आहे. अनिल दुबे यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त चार महिन्याचा कालावधी मिळणार होता. नियमानं तो कमीतकमी सहा महिने कालावधी मिळायला हवा. संबंधित उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळणार नसल्यानं, खंडपीठाने हा निर्णय दिला.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. यामुळे विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी, चंद्रपूर शहरातील गांधी चौक इथं सभा घेत त्यांनी जनतेला आशीर्वाद मागितला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

गडचिरोलीत महायुतीचे लोकसभा उमेदवार अशोक नेते यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

****

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी या रॅलीला कार्यकर्ते स्वेच्छेने आले असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार असल्याचं सांगितलं.

****

महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, असं आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल, असं पटोले म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

****

गडचिरोलीचे माजी आमदार आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गडचिरोली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही घोषणा केली. पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षानं डॉ.किरसान यांना बदलून मला उमेदवारी दिली तर माझा सन्मान होईल, असंही ते म्हणाले.

****

येत्या २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी अंतिम जागावाटप जाहीर केलं जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज पुणे इथं पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्ष संकेतच पवार यांनी दिले.

दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा पवार यांनी यावेळी केली. परभणीचा उमेदवारही दोन दिवसात ठरणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील. मात्र या पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलतांना आढळराव पाटील यांनी, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही आपल्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं सूचक विधान केलं.

****

लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचं शासन परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

****

गेल्या १७ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीनं आज उत्साहात सांगता झाली. उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे आणि देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महाआरती करण्यात आली. यावेळी वृंदावन इथल्या हरि भक्त परायण जनार्दन महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.

****

होळीनिमित्त नांदेडमध्ये शीख बांधवांच्या वतीनं होला मोहल्ला मिरवणुकीला आज सायंकाळी प्रारंभ झाला. श्री सचखंड गुरुद्वारामधून या मिरवणुकीला प्रारंभ झाला असून हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात येत्या चार एप्रिलला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग शेतकरी शेती पर्यावरण आणि समाज उध्वस्त करणारा असल्याचा आरोप या समितीनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं, बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं.

****

पुण्याच्या यशदा इथले अधिकारी आणि नांदेडचे भूमिपुत्र डॉ. बबन जोगदंड यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळाच्या समाजशास्त्र विषयाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. जोगदंड हे मूळचे हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ इथले रहिवासी असून ते सध्या यशदा या शिखर प्रशिक्षण संस्थेत गेल्या वीस वर्षापासून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जोगदंड यांना अकरावी- बारावीच्या समाजशास्त्र या विषयासाठी सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्या या निवडीचं सर्वत्र स्वागत होत आहे.

****

लातूर शहर महानगरपालिकेतील थकित मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंतच लागू राहणार असून व्याजमाफीच्या या सवलतीचा लातूर शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा घेण्याचं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करण्यासह जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्याजमाफी मिळवावी, असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्यावतीनं आज एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन या विषयावर मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ.मृदुल निळे, नागपूर इथल्या राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे डॉ. जितेंद्र वासनिक यांचे व्याख्यान झालं. माजी प्रकुलगुरु प्रा.डॉ.श्याम शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत सहभागी झाले.

****

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं औद्योगिक वसाहत परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एका कारखान्याला अचानक भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यातील वस्तू इतर साहित्य खाक झालं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...