Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात पीरबावडा इथं, बीड शहरासह जिल्ह्यात आष्टी तालूक्यात, हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी, नांदेड शहरासह जिल्ह्यात अर्धापूर तसंच हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळं काढणीला आलेल्या ज्वारी, हरबरा, हळद पिकांसह आंबा, केळी आणि संत्रा फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते काल चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना यावेळी भारत रत्न पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.
****
आज ईस्टर संडे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर संडे हा सण प्रेम आणि करुणेचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर या सणाच्या माध्यमातून करुणा, प्रेम, आणि क्षमा याचं पुनःस्मरण होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी, हा सण, नावीन्यता आणि आशावादाचा संदेश प्रसारीत करेल तसंच या विशेष प्रसंगी नागरिकांमध्ये एकता आणि शांतता राहण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ईस्टर संडेनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतीपुरा परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल, ताशे तसेच लेझीम पथकांच्या गजरात भाविक उत्साहात सहभागी झाले.
****
महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरु भांडण सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आंबेडकर यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही टीका केली. ज्या मतदार संघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथं उमेदवार पळवणं, पक्षांमध्ये फोडाफोडी करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हात मिळवणी करणं असे प्रकार सुरु आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आजपासून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होत असून, हैदराबाद तसंच मुंबईसाठी एक वाढीव विमान सुरू होणार आहे.नांदेडमध्येही विमान सेवेला आजपासून प्रारंभ होत आहे. नांदेड - बंगळुरू, नांदेड - दिल्ली - जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड - हैदराबाद आणि नांदेड -अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, जालंदर - दिल्लीमार्गे आज पहिले विमान दुपारी सव्वाचार वाजता नांदेड इथं पोहोचणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
इंडियन प्रिमीयर लीग- आयपीएल अंतर्गत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटंन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडासंकूलात दुपारी साडेतीन वाजता तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात विशाखापट्टणम इथं सायंकाळी साडेसात वाजता होईल. या स्पर्धेत काल लखनऊ इथं झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्सचा २१ धावांनी पराभव केला.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थ्यांचं एप्रिल महिन्यात सर्वेक्षण तर मे महिन्यापासून प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेच्या मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीची वसूली ही मागील वर्षापेक्षा चारशे टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपालिकांनी डिसेंबर पासून करवसुलीवर अधिक भर दिल्यानं, यावर्षी ५८ कोटी रुपये एवढी करवसुली झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment