Friday, 29 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२९ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील. रश्मी बर्वे यांनी काल रात्री उशीरा पत्रकार परिषद घेत, विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला.

****

शिर्डी लोकसभेची जागा अजुन निश्चित झाली नाही, असं सांगत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी, शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. काल पुण्यात पक्षाच्या गट राज्य कार्यकारणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरपीआयचं एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

****

प्रभू येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

दुसऱ्यांकडून शब्द पाळण्याची अपेक्षा काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी करत असून, स्वतः मात्र राष्ट्राप्रती असलेल्या कोणत्याही जबाबदारीचं पालन करत नाही, असा आरोप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वकीलांच्या एका गटानं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून, न्यायव्यवस्थेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात हे आरोप केले.

काही लोक राजकीय स्वार्थासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या राजकीय व्यक्तींकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असं वकीलांच्या गटानं सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

अमेरिकेनं भारताच्या निवडणूक तसंच न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना, मंत्रालयाचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी, भारताच्या अंतर्गत प्रकरणात बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेच्या टिप्पणीवर भारतानं हे वक्तव्य केलं.

****

No comments: