Saturday, 30 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३० मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आज देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करणार आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केला जाईल. माजी उपपंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देखील भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

****

अतिशय मजबूत अशी न्यायिक संस्था असलेली भारतीय लोकशाही अतिशय सुदृढ आहे, त्यामुळं कोणा एका व्यक्ती किंवा गटामुळे तिला कोणतंही नुकसान होऊ शकणार नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेच्या ७० व्या स्थापन दिनानिमित्त ते काल नवी दिल्लीत बोलत होते. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत आणि जे स्वत:ला कायद्याच्या कक्षेबाहेर समजतात त्यांनाही कायदा जबाबदार धरतो, असं त्यांनी नमूद केलं.

****

जी-ईएम अर्थात जेम या सरकारी इ-बाजारपेठेनं सरत्या आर्थिक वर्षांत, चार लाख कोटी रुपये इतक्या विक्रमी सकल व्यापारी मूल्याची नोंद केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. हे विक्रमी आकडे म्हणजे- सार्वजनिक क्षेत्रातून खरेदी करण्याची प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीनं पार पाडण्यासाठी जी-ईएम संकेतस्थळ सुयोग्य प्रकारे कार्यरत असल्याचंच प्रतीक आहे, असं मत जी-ईएम चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी के सिंग यांनी व्यक्त केलं आहे. 

****

रंगपंचमी आज साजरी होत आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात आज रंग खेळला जातो. नाशिक शहरात सहा पेशवेकालीन रहाडी असून, रंगपंचमीनिमित्त त्या खुल्या करण्यात आल्या आहेत. विधीवत मानकऱ्यांच्या हस्ते पुजन करुन या रहाडीत रंग खेळले जातात. या रंगोत्सवासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २८ मार्च रोजी निवृत्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

****

No comments: