Wednesday, 27 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन ‌गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या ८९ जागांसाठीची अधिसूचना उद्या २८ मार्च रोजी काढली जाणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ - वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. औरंगाबाद लोकसभा मतदरासंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर, तर परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी घोषित झाली आहे.

त्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना, दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील, उत्तर पश्विम मुंबई - अमोल किर्तीकर, ठाणे - राजन विचारे, रत्नागिरी - सिंधुदुर्ग - विनायक राऊत, बुलढाणा - नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम -संजय देशमुख, मावळ - संजय वाघेरे-पाटील, सांगली - चंद्रहार पाटील, शिर्डी -भाऊसाहेब वाघचौरे, तर नाशिक इथून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे.

****

दरम्यान, ठाकरे गटाच्या या यादीवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर माहविकास आगाडीमध्ये चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आघाडी धर्माचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे, असं आपलं मत असून, ठाकरे गटानं या जागांवर फेरविचार करावा, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

****

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूकीत ओबीसी महासंघाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अकोल्यातून आपण स्वत: निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलडाणा इथून वसंत मगर, अमरावती - प्राजक्ता पिल्लेवान, चंद्रपूर - राजेश बेले, भंडारा- गोंदिया - संजय केवट, गडचिरोली-चिमुर - हितेश मडावी, वर्धा - राजेंद्र सांळुंके, तर यवतमाळ-वाशिम इथून खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीची चर्चा अद्याप सुरु असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. आज मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मनसेने तीन जागा मागितल्या असून, दोन जागांवर चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकरता सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्याकरता निवडणूक आयोगानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जारी केलेल्या सुचनांची प्रत जारी केली आहे. यानुसार लोकांनी दुपारी विशेषतः १२ ते तीन या वेळेत बाहेर उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी आणि सावलीची सोय या किमान सुविधा पुरवण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत.

****

लातूर शहर महानगरपालिकेनं थकित मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंतच लागू राहणार असून, व्याजमाफीच्या या सवलतीचा लातूर शहरातल्या नागरिकांनी लाभ घ्यावा घेण्याचं आवाहन, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.

****

उन्हाळी सुट्टी दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरुपती, हैदराबाद-जयपूर-हैदराबाद, तिरूपती -अकोला-तिरुपती, पूर्णा-तिरूपती-पूर्णा या गाड्यांचा यात समावेश असून, सर्व गाड्यांना सुमारे दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये, भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी पुरुष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत काल त्यांनी नेदरलँड - ऑस्ट्रेलियन जोडीचा तीन - चार, सात - पाच, दहा - सात असा पराभव केला.

****

No comments: