Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 March
2024
Time 18.10 to
18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चार मान्यवरांना मरणोत्तर
भारतरत्न सन्मान प्रदान;लालकृष्ण अडवाणी यांचा उद्या निवासस्थानी गौरव
· राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी
पाच उमेदवारांची घोषणा
· नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दोन तर हिंगोली इथं एक अर्ज दाखल
· मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा
निवडणुकीतून माघार
आणि
· लातूर तसंच धाराशिवसह राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार
मान्यवरांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे
माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना
मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आले. नरसिंहराव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर
राव, स्वामीनाथन यांच्या कन्या नित्या राव, चरणसिंग यांचे नातू जयंतसिंग, कर्पूरी
ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या
या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस
अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी उपपंतप्रधान
लालकृष्ण अडवाणी यांना उद्या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान
प्रदान करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार
गटाने आज लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाच उमेदवारांमधे बारामती तसंच
शिरूर इथून विद्यमान खासदार अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची घोषणा झाली.
अहमदनगर इथून निलेश लंके,
वर्धा इथून अमर काळे, तर दिंडोरीहून भास्कर भगरे हे
उमेदवार असणार आहेत.
दरम्यान, शिवसेना आणि भारतीय जनता
पक्षाने आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र
पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दोन्हीही पक्षांनी लोकसभा निवडणूकीत आपल्या
पक्षाच्या स्टार प्रचारकांमधे इतर पक्षांच्या नेत्यांच्या समावेश करतांना त्यांच्या
पदाचा उल्लेख केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
****
परभणी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार महादेव
जानकर हे आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केलं आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, जानकर यांनी येत्या सोमवारी
आपण अर्ज भरणार असल्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
गट वगळता इतर पक्षांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आपण महायुतीमध्ये आल्याचं
जानकर यांनी सांगितलं.
****
माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील यांनी आज
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.
भागवत कराड,
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांनी
त्यांचं स्वागत केलं. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल, असा
विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे
यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत आज नांदेड
लोकसभा मतदारसंघासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले. गुरुवारी एक आणि आज २ असे एकूण ३
अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अकबर अख्तर खान यांनी तसंच साहेबराव
भिवा गजभारे या अपक्ष उमेदवाराने आज अर्ज दाखल केला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ही माहिती दिली.
हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
शिवसेनेचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं. आज १४ जणांना
५६ उमेदवारी अर्जांचं वितरण करण्यात आलं. आतापर्यंत एकूण ५४ इच्छुक उमेदवारांना १७५
नामनिर्देशनपत्रांचं वितरण करण्यात आलं आहे.
****
नाशिक लोकसभेसाठी आपल्या उमेदवारीचा प्रस्ताव
दिल्ली इथं झालेल्या महायुतीच्या बैठकीत मांडला असल्याचं, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं माध्यमांशी बोलत
होते. आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता, त्यांना
स्वतंत्र आरक्षण द्यावे एवढीच आपली भूमिका होती, ती आता मान्य झाल्याचं
भुजबळ म्हणाले.
****
यवतमाळ इथं मतदान आपला अधिकार आणि कर्तव्य
असा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी आज मानवी साखळी करून भारताचा नकाशा साकारला. 'वोट' अशी
अक्षरं आणि मतदान चिन्ह देखील त्यात साकारण्यात आलं होतं. नेहरू क्रीडा संकुलावर झालेल्या
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण
७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलं आहे. त्यासाठी थेट मतदान
केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
यांनी दिली आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आकाशवाणीच्या अस्मिता
वाहिनीवर आज आणि उद्या सायंकाळी सव्वा सात वाजता वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला
ही मुलाखत ऐकता येईल.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे
पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी
इथं त्यांनी ही घोषणा केली. आपण स्वतः निवडणुकीपासून दूर राहणार असून एकही अपक्ष उमेदवार
देणार नाही,
असं स्पष्ट करत, निवडणुकीबाबतचा निर्णय समाजानं
घ्यावा असं जरांगे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रंगपंचमीनिमित्त आज विविध ठिकाणी रंगोत्सव
साजरा झाला. राज्यात बहुतांश ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाच रंग
खेळला जात असला तरीही,
लातूर, धाराशिव, नाशिक आणि सोलापूरसह
काही शहरांमध्ये रंगपंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्रीतुळजाभवानी
मातेस पंचामृत अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर रंगाची उधळण करीत पारंपरिक पध्दतीने
रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी, सहाय्यक
धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह सेवेकरी पुजारी उपस्थित होते. तुळजाभवानी
मातेस रंग लावल्यानंतर शहरात रंगपंचमी खेळण्यास आरंभ झाला, सायंकाळी पाच वाजेपर्यत रंग खेळला गेला .
लातूर शहरात रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून
आला. शहरातील अनेक भागात तरुणाईचा मोठा उत्साह दिसून आला. तर अनेक ठिकाणी डीजेच्या
तालावर तरुणाई थिरकली. लातूर शहरात असलेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोरडे रंग खेळण्याचे
आवाहन प्रशासनातर्फे तसेच अनेक सामाजिक संघटनांनी केलं होतं. त्यानुसार अनेकांनी कोरडे
रंग खेळणेच पसंत केले. दरम्यान लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात आदर्श मैत्री फाउंडेशन
तर्फे ६५ आजी-आजोबांसोबत कोरडे रंग खेळून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नाशिक इथं श्री काळाराम मंदिरात रंग खेळण्यात
आला असून, यावर्षीच्या उत्सवाचे मानकरी राघवेंद्र पुजारी यांनी केशर पळसाच्या पानांचा रंग
अबीर गुलालाची श्रीरामावर उधळण केली.
नाशिक इथं रहाडी अर्थात जमिनीत बांधलेल्या
हौदांचं पूजन करुन रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा झाला.
****
परभणी लोकसभेचे निवडणूक खर्च निरीक्षक अनुराग
चंद्रा यांनी आज परभणी लोकसभा क्षेत्रातल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक
निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक घेतली. यात आदर्श आचार संहिता अंमलबजावणी, भरारी
पथक, बैठे पथक,
स्थिर चित्रीकरण पथक, चित्रीकरण तपासणी पथक यांच्यासह
निवडणूक खर्च पथक यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व पथकांना निवडणूक
खर्चाच्या अनुषंगाने कामजाबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
****
धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या
पळासनेर गावाजवळच्या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करतांना धुळे पोलिसांनी ७५ किलो
अफूची बोंडं आणि २ किलो अफू असे अंमली पदार्थ जप्त केले. एका पिकअप वाहनातून लसणांनी भरलेल्या गोण्यांच्या आडून ही तस्करी करण्यात
येत होती. वाहनासहित एकूण १७ लाख ७६ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत
केला. याप्रकरणी राजस्थान इथल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
****
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन
बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांचा पुरुष दुहेरीच्या अंतिम
सामना आज अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॉजिसेक आणि क्रोएशियाच्या इवान डोडिग या जोडीशी होणार
आहे. बोपन्नाचा हा १४वा एटीपी मास्टर्स अंतिम सामना असून, त्याने
आतापर्यंत २५ वेळा दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा दशांश
सेल्सियस तापमानाची अकोला इथं नोंद झाली. त्या खालोखाल वर्धा इथं ४२ पूर्णांक दोन, अमरावती
इथं ४१ पूर्णांक आठ,
चंद्रपूर, वाशिम तसंच परभणी इथं ४१ पूर्णांक सहा, सोलापूर
४१, यवतमाळ ४१ पूर्णांक दोन तर बीड इथं ४१ पूर्णांक एक, धाराशिव
इथं ३९ पूर्णांक नऊ,
तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment