Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 March
2024
Time 18.10 to
18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· कथित मद्यधोरण घोटाळाप्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यांना १ एप्रिलपर्यंत इडी कोठडी
· रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी
बर्वे यांचं जातप्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द
· सिनेअभिनेते गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश
· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत
२०२४-२५ वर्षासाठी रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी
आणि
· मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणचं तापमान चाळिशी पार
****
कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं १ एप्रिलपर्यंत
इडी कोठडी सुनावली आहे. मद्यघोटाळ्यात केजरीवाल यांना इडीनं २१ मार्च रोजी अटक केली
होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा केजरीवाल यांना इडीकडून न्यायालयात हजर करण्यात
आलं.त्यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांची इडी कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. दरम्यान, केजरीवाल
यांच्या अटकेवरुन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रीया दिली होती. त्यावर
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या
वक्तव्य अयोग्य आणि अनुचित असल्याचं म्हटलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील
महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं
रद्द केलं आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली
नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनील साळवे नामक व्यक्तीनं याबाबतची तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागानं जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचे
आदेश दिले होते. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीनं बर्वे यांना
नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
त्यानंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला
आहे.
****
सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला मिळालेली
जबाबदारी योग्यरित्या पार पाडू, अशी प्रतिक्रीया गोविंदा यांनी यावेळी दिली.
****
केंद्र सरकारनं २०२४-२५ या वर्षासाठी मनरेगा, अर्थात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत रोजगाराच्या सुधारित दराची
अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अकुशल कामगारांना प्रति दिवस मिळणाऱ्या वेतनाचा
दर हरियाणामध्ये ३७४ रुपये,
गोव्यामध्ये ३५६, कर्नाटकमध्ये ३४९ रुपये, केरळमध्ये
३४६, तर पंजाबमध्ये ३२२ रुपये इतका असेल. येत्या १ एप्रिलपासून सुधारित वेतन दर लागू
होणार असल्याचं ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
बंगळुरू इथं आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या
मदतीनं तेजस एम के -१ ए या हलक्या विमानाची चाचणी यशस्वी रित्या पार पडली. हे तेजस
विमान आधुनिक अशा इलेक्ट्रॉनिक रडार, संचार प्रणाली आणि युद्ध क्षमतांनी
परिपुर्ण असून यात हवेतच इंधन भरण्याची सोय असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मध्य प्रदेशातील जबलपूर इथं नुकत्याच झालेल्या
४५ व्या अखिल भारतीय आंतर विद्युत क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण
संघानं शरीरसौष्ठव आणि भारोत्तोलन खेळात लक्षणीय यश मिळवलं आहे. महावितरणतर्फे या स्पर्धेत
एकूण सात जणांनी सहभाग घेतला होता. शरीरसौष्ठव प्रकारात राहुल कांबळे आणि विशाल मोहाळे
यांनी रौप्यपदक तसंच सूरज कोंगे आणि अमित पाटील यांनी कांस्यपदक पटकावलं तर वाळूज एमआयडीसी
शाखेचे सहायक अभियंता रवी मिरगणे यांनी भारोत्तोलन खेळात कांस्यपदक मिळवलं. याच प्रकारात
महवितरणनं सांघिक तृतीय पारितोषिकही पटकावलं आहे. महावितरणनं या स्पर्धेत एकूण सहा
पदकं पटकावली आहेत.
****
रायगड जिल्ह्यातील मुरुड किनारपट्टीवर बेकायदेशीर
मासेमारी केल्याप्रकरणी तटरक्षक दलानं ३७ मच्छिमारांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत
पोलिसांनी ४ मच्छिमार नौका,
उच्च शक्तीचे ४२ हॅलोजन, २२ पाण्याखालचे एलईडी डिझेल
जनरेटर तसंच प्रतिबंधित मासेमारी गिअर असं एकूण ३० लाखांचं साहित्य जप्त केलं आहे.
या एलईडी मासेमारीमुळं स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
काल रात्री गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या
सीमावर्ती भागात भूमकान गावानजीकच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक
झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांचं साहित्य ताब्यात घेतलं
आहे. काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही चकमक सुरू होती. नक्षवाद्यांनी
पोलिसांवर बॅरल ग्रेनेड लाँचरचा मारा केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर
देऊन हल्ला परतावून लावला.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार
जयंती साजरी होत येत आहे. यानिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
इथं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दादर इथल्या
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला
पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत
आज 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'तर्फे शिवज्योत दौड पार पडली
तर धुळे शहर आणि जिल्ह्यातही शिवजंयती साजरी करण्यात आली.
****
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक अधिसूचना
जारी झाली आहे. याबरोबरच नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी
नांदेड लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल झालं आहे. अपक्ष उमेदवार जफर अली
खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही आज पहिल्या
दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरला आहे.
****
"सांगली लोकसभा मतदारसंघांतील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही, याबाबत
सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी तसंच अत्यंत सूक्ष्मपणे टपाली
मतदान प्रक्रिया समजून घ्यावी", असं आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलं आहे. सांगलीत आज टपाली मतदान पत्रिकेबाबत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी
बोलत होते.
****
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी
आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं फ्रान्स इथल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'जिप्सी', "भेरा" आणि 'वल्ली'
या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली, अशी
माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज मुंबईत दिली. फ्रान्सच्या
कान्स इथं मे महिन्यात १४ ते २२ तारखेदरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे.
****
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं चाळिशी
पार केली आहे. राज्यात आज सर्वाधिक ४२ पूर्णांक ८ अंश सेल्सियस तापमान अकोला इथं नोंदवलं
गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथं ४२ तर जळगाव इथं ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली. सोलापूर,
बुलडाणा, यवतमाळ आदी शहरातही पारा चाळीस अंशाच्या
वर पोहोचला आहे.
मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक ४१ पूर्णांक
दोन अंश सेल्सियस तापमान असून त्याखालोखाल नांदेड इथं ४० पूर्णांक दोन, बीड
इथं ४० पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतील नागरिकांना
आपला थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च रोजी
सुट्टीच्या दिवशीही महानगर पालिकेनं सर्व वार्ड, प्रशासकीय कार्यालयं
सुरू ठेवली आहेत. नागरिकांना सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कर भरता येणार आहे.
ज्यांची मालमत्ता कराच्या कक्षेत नाही अशा नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या मालमत्तेला
कर लावून घ्यावा,
असं आवाहन महानगर पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. कर भरणा
करण्यासाठी बहुतांशी नागरिकांनी दिलेले धनादेश वटले नसून यापुढे धनादेश न वटल्यास संबंधित
नागरिकांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असंही महानगर पालिकेच्या
वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिले
जाणारे विशेष वाङमय पुरस्कार उद्या प्रदान करण्यात येणार आहेत.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापुरकर सभागृहात सायंकाळी साडे पाच वाजता मसापचे अध्यक्ष
कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ गायक पंडित
नाथ नेरळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे नाथस्वर या कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता शहरातल्या तापडिया नाट्य मंदीरात
हा कार्यक्रम होईल.
****
No comments:
Post a Comment